महाराष्ट्रभर १०० आदर्श गावे निर्माण करण्याचा बाबासाहेब पावसे पाटील यांचा संकल्प

चंद्रपूर : सरपंचांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेली ‘सरपंच सेवा संघ’ ही महाराष्ट्र राज्यातील एकमेव सरपंच संघटना आहे. या संघटनेच्या वतीने राज्यातील काही गावे दत्तक घेऊन वेगवेगळ्या तालुक्यातील गांवे आदर्श करण्यासाठी सरपंच सेवा संघ कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन सरपंच सेवा संघाचे युवानेतृत्व संस्थापक बाबासाहेब पावसे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे. भावी काळात त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर १०० आदर्श गावे निर्माण करण्याचा त्यांनी संकल्प केला आहे.

आदर्श गाव निवड समिती प्रकल्पाचे प्रमुख जगदीश एन. पाचभाई, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील काही गावांमध्ये या उपक्रमाचा शुभारंभ झाला. सरपंच सेवा संघ पहिल्या टप्प्यात राज्यभर १०० गावे दत्तक घेऊन वेगवेगळ्या योजना राबविण्यासाठी ग्रामीण भागात वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेची माहिती देत सर्व सामान्य माणसाला स्वच्छ आणि सुंदर गांव कसे असावे ? याबाबत जन जागृती अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य विभागीय कार्याकारिणी, जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी सदस्यांच्या माध्यमातून कार्य करणार आहे. असे श्री पाचभाई यांनी सांगितले. या अभियानांतर्गत सरपंच सेवा संघाच्या वतीने राजुरा तालुक्यातील काही ठिकाणी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. गावात विविध कार्यक्रम राबवून गावातील समस्या जाणून घेऊन नुकतेच आर्वी ता. राजुरा गावांत कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील युवक, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
