इतर मंदिरांच्या विश्वस्त मंडळांनी मंगळग्रह मंदिराच्या विश्वस्त मंडळाचा आदर्श घ्यावा : हरीश बैजल

अमळनेर : येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरात सायबर क्राईम चे डी.आय.जी. हरीश बैजल (मुंबई) दर्शन व अभिषेकासाठी सपत्नीक आले असता त्यांच्या हस्ते प्रा. अशोक पवार लिखित ‘आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम २००७, नियम २०१० व योजना’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. मंगळग्रह सेवा संस्थेने ही ५०० पुस्तके विकत घेऊन ती ज्येष्ठ नागरिकांना मोफत देण्याचे ठरविले आहे. त्यापोटी प्रा. पवार यांना २५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. प्रातिनिधिक स्वरूपात काही ज्येष्ठ नागरिकांना पुस्तकाच्या प्रती बैजल यांच्या हस्ते मोफत वाटण्यात आल्या.
श्री बैजल म्हणाले की, खास करून उच्चभ्रूंकडून आई-वडिलांना दिली जात असलेली वाईट वागणूक पाहून उच्च शिक्षणामुळे काहीजण भरकटत जातात की काय ? असे वाटू लागले आहे. इतर मंदिरांच्या विश्वस्त मंडळांनी मंगळग्रह मंदिराच्या विश्वस्त मंडळाचा आदर्श घ्यावा असे मत सायबर क्राईम चे डी.आय.जी. हरीश बैजल (मुंबई) यांनी यावेळी व्यक्त केले. ‘पोलिस उपअधीक्षक पदाच्या वर्षभराच्या प्रशिक्षण काळात आम्ही १२ पैकी ११ जण पत्नीसह नासिक येथे सोबत आले होते. अर्थात त्यांची व्यवस्था प्रशिक्षण केंद्राबाहेर भाड्याच्या घरांमध्ये करण्यात आली होती. मी मात्र आई- वडिलांना सोबत आणले होते’, अशी आठवण बैजल यांनी करुन दिली. प्रा. अशोक पवार यांनी पुस्तकाचे महत्त्व विशद करून मंगळग्रह सेवा संस्था करीत असलेल्या कार्याची प्रशंसा केली.
पोलीस नाईक डॉ. शरद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी आभार मानले. यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस.एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे तसेच पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, साक्री येथील पंचायत समितीचे माजी सभापती नितीन बेडसे, माजी नगरसेवक विनोद कदम, निवृत्त केंद्र प्रमुख बन्सीलाल भागवत, ज्येष्ठ नागरिक, भाविक व मंदिराचे सेवेकरी आदी उपस्थित होते.
