पुणे : महा एनजीओ फेडरेशन व सोशल रिस्पॉन्सिबीलिटी समूह परिवाराच्या वतीने महाराष्ट्रात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुरुषांसाठी विवेकानंद व महिलांसाठी जिजाऊ पुरस्कार मागील सात वर्षांपासून देण्यात येतो. पुणे शहरातील पत्रकार भवन येथे नुकताच दि. १२ जानेवारी रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडला. यात अमळनेर येथील मूळ रहिवासी असलेले सामजिक कार्यकर्ते मयूर बागुल यांना विवेकानंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पुणे शहरातील प्रथम नागरीक महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी – चिंचवडचे आय.पी.एस. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पोलिस अधिकारी तथा मिसेस इंडिया, मिसेस युनिव्हर्स ब्रेवरी सौ. प्रेमा पाटील, महा एनजीओ फेडरेशन पुणेचे संस्थापक अध्यक्ष शेखरभाऊ मुंदडा, समग्र नदी परिवार, पुणेचे अध्यक्ष सुनिल जोशी, व सोशल रिस्पॉन्सिबीलिटी समूह चे अध्यक्ष विजय वरूडकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुकुंदराव शिंदे या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
पुरस्काराला उत्तर देताना मयूर बागुल यांनी सांगितले की, हा सन्मान आपल्या सर्वांचा आहे. जे माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या सोबत कार्य करतात त्या सर्वांचा सन्मान आहे. मी फक्त निमित्त आहे. आपल्या विश्वासामुळे मला कार्य करण्यास बळ व ऊर्जा मिळत असते. हा सन्मान म्हणजे समाजासाठी अधिक मोठं कार्य घडावे यासाठी ही प्रेरणा व थाप आहे, असेही ते सांगतात.