पातोंडा येथील अध्यात्मिक किर्तन सोहळ्यास तोबा गर्दी
अमळनेर : तालुक्यातील पातोंडा येथे काल रविवार दि.२४ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता नियोजित वेळेत समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती उर्फ इंदूरीकर महाराज यांचा अध्यात्मिक किर्तन सोहळा पार पडला. पातोंडा येथील श्रीराम सुखदेव बिरारी यांचा मुलगा संदीप बिरारी यांच्या पत्नीस ब्रेन ट्युमर (कॅन्सर) ने ग्रासले होते. श्री पांडुरंगाच्या कृपेने त्या कॅन्सरमुक्त झाल्याने या अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला संदीप बिरारी यांनी परिवारा समवेत इंदुरीकर महाराज यांचा सत्कार केला.
अध्यात्मावर बोलतांना ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांनी संसार, चिंता, हुंडाबळी, बलात्कार, व्यसनाधीनता आदी विषयांवर उपस्थितांना डोस पाजले. व्यसनात पैसा उधळण्यापेक्षा काही पैसा राममंदिराला द्यावा असा सल्लाही दिला. रामायण म्हणजे सर्व तीर्थ काशी आणि त्याहीवर सर्व तीर्थ म्हणजे ‘आई बाप’ असल्याने त्यांना देव माना. ज्याने आई बापाची सेवा केली त्याला कोणत्याही देवाकडे जाण्याची गरज नाही. माणसाने काळजी जगण्यासाठी नव्हे तर आनंदासाठी करावी, कोरोनाने जगाला जगायला शिकविले. मोबाईलच्या अतिवापरामुळे लोकांचा संवाद संपला असून अनेक जण मनोरुग्ण होत असल्याचे सांगितले. मोबाईल मुळे ८०% लोकांना दृष्टीदोष आला आहे. हे सर्व टाळण्यासाठी इंद्रीयांवर ताबा हवा. ज्या व्यक्तीने इंद्रीयांवर ताबा मिळविला तो शूर म्हणावा. जीवन जगताना चिंता, ताण तणाव आहेच. यामुळे मृत्यू हाच आनंदाचा दिवस समजावा असेही त्यांनी सांगितले. सद्य परिस्थितीवर विनोदी भाष्यातून चौकार षटकार मारत प्रेक्षकांना जागेवर खिळवून ठेवले.
कार्यक्रमाला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांची कार्यक्रमास उपस्थिती होती. ग्रामपंचायत चौक व नांद्री बस स्टँड समोरील डी.ओ.पवार यांचे शेतात मठगव्हाण, रुंधाटी, मुंगसे, अमळनेर, गडखांब, दहिवद, देवळी, नगाव, गांधली, पिळोदे, अमळगाव, खौशी, खेडी, पिंपळी, जळोद आदी परिसरातील वाहनांची पार्किंग व्यवस्था होती. रतन नगर व टाॅवर जवळ धरणगाव, चोपडा, सावखेडा, साळवा, रोटवद, साकरी परिसरातील वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दक्षिण मुखी हनुमान मित्र मंडळ, ग्रामस्थ, स्वयंसेवकांनी मोलाची भूमिका पार पाडली. पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाचे सहकार्य लाभले.