उपसरपंच पदी नितीन पारधी
पातोंडा : अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे दि.१७ रोजी सरपंच निवड पार पडली. यात विनायक दादा बिरारी यांच्या पॅनेलचे वर्चस्व सिध्द झाले. भरत देवाजी बिरारी यांची सरपंच पदी तर नितीन मंगल पारधी याची उपसरपंच पदी १३ पैकी ८ मते मिळवत निवडून आले. सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गाकरीता जाहीर झाल्यापासून एकवीस दिवसानंतर अखेर सरपंच पदाच्या निकाला नंतर राजकीय नेते व ग्रामस्थांची उत्सुकता संपली. सरपंच पदा करीता भरत देवाजी बिरारी व संदिपराव भगवंतराव पवार तर उपसरपंच पदा करीता नितीन मंगल पारधी व ज्ञानेश्वर जगन्नाथ सोनवणे यांनी उपसरपंच पदाकरीता नामनिर्देशन पत्र दाखल केले. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल भदाणे यांनी भरत बिरारी, नितीन पारधी, दिलीप बोरसे, संदिपराव पवार, ज्ञानेश्वर सोनवणे, सोपान लोहार , शितल पाटील, मनिषा मोरे, प्रतिभा शिंदे, रेखा पाटील, ज्योती संदानशिव, वैशाली पवार व कल्पना पवार या सर्व ग्रा पं सदस्यांना दुपारी दोन वाजेला सभेकरीता आमंत्रित केले. सभेदरम्यान भरत बिरारी यांनी हात वर करून मतदान घेण्याची मागणी केली असता संदिपराव पवार यांनी गुप्त मतदानाची मागणी केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी गुप्त मतदान घेण्याचा निर्णय घेतला. मतदान प्रक्रिया पार पडल्या नंतर दुपारी तिन वाजेच्या सुमारास भरत बिरारी यांना सरपंच पदी तर नितीन पारधी यांना उपसरपंच पदी तेरा पैकी आठ मतांनी विजयी घोषीत केले. या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी अमोल भदाणे, ग्रामविस्तार अधिकारी बी वाय पाटील, तलाठी वाय आर पाटील, सहा. पो. नि. नरसिंह वाघ, पो.काॅ. मेघराज महाजन व योगेश महाजन, कोतवाल रोहित सोनवणे, शिपाई राजेंद्र वाणी यांनी निवडणूक प्रक्रिया यशस्वी पार पाडली. सरपंच पदी निवडून आल्यानंतर भरत बिरारी यांनी निवडणूक प्रक्रियेत रामदास मोरे, भिकन बोरसे, साहेबराव गावंडे, भास्कर देवरे, पंडितराव लाड,, रमेश निंबाळकर, किशोर मोरे, महेंद्र पाटील सर, प्रकाश बिरारी, आण्णा पाटील, विजय मोरे, संभाजी बिरारी, चंद्रकांत शिंदे, पांडूरंग शिंदे, नारायण बापू, शरद शिंदे, प्रविण लाड, रमेश बिरारी, राजेंद्र यादव, किशोर पाटील, घनशाम पाटील, राकेश पाटील, बबन बिरारी, पंजाब बिरारी, विलास संदानशिव, सोपान शिंदे, भुरा संदानशिव, बंटी बोरसे, बापू घाडगे, दिलीप बिरारी, किशोर देवरे, पद्माकर वाघ, रामभाऊ बागुल, भाऊसाहेब बागुल व आदी सहकार्य करणा-या सर्वांचे आभार व्यक्त केले.
आठव्या मताची चर्चा
पातोंडा ग्रा पं सदस्य संख्या तेरा असून सरपंच व उपसरपंच निवडून येण्याकरिता सात सदस्यांच्या संख्याबळाची आवश्यकता असते. भरत बिरारी यांचेकडे सात सदस्य होते तर संदिपराव पवार यांचेकडे सहा सदस्य होते परंतू मतदान प्रक्रिया पार पडल्या नंतर भरत बिरारी यांच्या पारड्यात आठ मतदान पडल्याने आठवे मतदान नेमके कोणी टाकले याबाबत ग्रा पं सदस्य व ग्रामस्थांमधे उलटसुलट चर्चेला उधाण आले.
सरपंच उपसरपंच निवडीच्या आनंदावर शोककळा
एकीकडे सरपंच , उपसरपंच निवड घोषीत झाली व त्याच वेळी नवनिर्वाचित उपसरपंच नितीन पारधी यांच्या मेहूण्यांचे निधन झाल्याची वार्ता येऊन धडकली. या निधन वार्तेमुळे सगळीकडे एकच शोककळा पसरली. सरपंच, उपसरपंच निडणूकीत विजय मिळविल्यानंतर कुठलाही आनंदोत्सव साजरा न करता सर्व ग्रा पं सदस्य व ग्रामस्थ हे उपसरपंच नितीन पारधी यांच्या दुःखात सहभागी झाले.