पारोळा तालुक्यातील राजवड येथे तमाशा कलावंतांना शिधा वाटप

जिल्ह्यातील विविध समाजसेवी संघटना व दानशूर व्यक्ती करताहेत तमाशातील कलावंतांना मदतीचे आवाहन

पारोळा : तालुक्यातील आदर्शगाव राजवड येथे मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या सहकार्याने तमाशा कलावंताना शिधा वाटपाचा छोटेखानी कार्यक्रम नुकताच झाला. कोरोना काळात लाॅकडाऊनमुळे तमाशा कलावंताना उपासमारीची झळ पोहचू नये यासाठी जळगांव जिल्ह्यातील विविध समाजसेवी संघटना व दानशूर व्यक्ती तमाशातील कलावंतांना मदत करण्याचे आवाहन करीत आहेत. अखिल भारतीय शाहीर संघटनेचे सदस्य शेषराव गोकुळ -धुळे, अखिल भारतीय नाट्यमंडळाचे सदस्य विनोद ढगे -जळगांव, संदीप घोरपडे -अमळनेर यांचा यात सहभाग आहे. त्यांच्या भावनिक आवाहनास कांताई जैन फाऊंडेशन तसेच जैन उद्योगसमूहाचे चेअरमन अशोक जैन यांनी प्रतिसाद देत पारोळा तालुक्यातील तमाशा कलावंतांना शिधावाटप केला. राजवड गावी येणा-या कलावंतांसाठी कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी वेफर, कुरमुरे पाकीट, कोल्ड्रींक्स व पाण्याची व्यवस्था करुन दिली. तसेच कलावंतांना प्रवासभत्ता म्हणून प्रतिव्यक्ती रुपये १००/- मदत केली. संदीप घोरपडे, विनोद ढगे व शेषराव गोपाळ यांनी कोरोनाचा तमाशावर व तमासगीरांवर होणारे गंभीर परीणाम याविषयी आपले विचार मांडले.
श्री संदीप घोरपडे आपल्या मनोगतात म्हणाले की, राजवड गावात पुर्वी यात्रा व तमाशे यांचा उत्साह असायचा पण काही कारणास्तव राजवड गावात यात्रा व तमाशे बंद करण्यात आलेत. तमासगीरांना विशेष सन्मान व स्नेह पुर्वक वागणूक देऊन जणू काही राजाश्रय द्यायचे. कोरोनाचा वाईट काळ संपल्यावर राजवड गावात परत तमाशे सुरु करुन तमासगीरांवरील राजाश्रयाचे छत्र पुन्हा उभारावे असे साकडे कृषिभूषण साहेबराव पाटील यांना ग्रामस्थांच्या वतीने घालण्यात आले. अमळनेर हे खान्देशातील तमासगीरांचे केंद्र असून तेथेही त्यांनी जागा उपलब्ध करुन दिल्यास लवकरात लवकर विद्यमान आमदार अनिल पाटील यांचेमार्फत तमासगीरांचे हक्काचे कायमस्वरुपी केंद्रीय कार्यालय व विश्रामगृह निर्मिती करण्याचे सुतोवाच संदीप घोरपडे यांनी केले.
कार्यक्रमास राजवडचे सरपंच हरी नामदेव पाटील, संदीप घोरपडे, विनोद ढगे, शेषराव गोपाळ, निशिकांत पाटील, प्रशांत निकम, लोटन देसले, गणेश पाटील, दत्तु पाटील, राजु पाटील (वस्ताद), अशोक परदेशी, अमोल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, पवन पाटील, राजु पाटील (शिपाई), भास्कर पाटील, पारोळा तालुक्यातील तमाशा कलावंत सुनंदा कोचुरे व कल्पना कोचुरे यांचेसह ३५ कलावंत उपस्थित होते. कोरोना काळात शिधा वाटप करुन मदतीचा हात दिल्याबद्दल तमासगीर कलावंतांनी जैन उद्योग समूहाचे चेअरमन अशोक जैन, कृषिभूषण साहेबराव पाटील, अमळनेेरच्या नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, संदीप घोरपडे, विनोद ढगे, शेषराव गोपाळ व राजवड ग्रामस्थांचे आभार मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!