
अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या गंगाराम सखाराम हायस्कूलच्या ८३व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी विविध कार्यक्रम पार पडले. ग्रीन स्कूल चे उद्घाटक म्हणून आमदार अनिल भाईदास पाटील तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष जितेंद्र जैन होते. सोबत व्यासपीठावर माजी आमदार साहेबराव पाटील, जि.प.सदस्या जयश्री पाटील, खा.शि.मंडळाचे कार्योपाध्यक्ष निरज अग्रवाल, संचालक प्रदीप अग्रवाल, संदेश गुजराथी, हरी भिका वाणी, अध्यक्ष अनिल कदम, उपाध्यक्ष कमल कोचर व माधुरी पाटील, विश्वस्त वसुंधरा लांडगे, अभिजीत भांडारकर, निलेश भांडारकर, प्रभाकर कोठावदे, प्रभारी प्राचार्य डॉ. प्रकाश शिरोडे, अनिल वैद्य, द्रौ.रा. कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका जे.के.सोनवणे, उपमुख्याध्यापक ए. एस. करस्कार, पर्यवेक्षक व्ही. व्ही. कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार अनिल पाटील यांनी ध्वजारोहण करून शाळेचा लोगो असलेला संदेशात्मक कंदील फुग्यांच्या सहाय्याने आकाशात सोडला. आमदारांनी सपत्नीक भूमातेचे पूजन केले. सर्व प्रमुख अतिथींसह उपस्थितांनी वृक्षारोपण केले. ग्रीन स्कूलची संकल्पना असलेला केकही अतिथींनी कापला. कार्यक्रमात शालेय शिक्षक व शिक्षिका यांचा ग्रीन स्कूल ला पूरक असा पेहराव लक्षवेधी ठरला. वर्धापनदिन निमित्ताने ग्रीन स्कूल या पर्यावरण पुरक संकल्पनेचा प्रारंभ झाला असल्याने राज्यातील ही एकमेव शाळा ठरली असून शाळेच्या नाव लौकिकात अधिक भर पडली आहे. शाळेचा ग्रीन स्कूल व पेपरलेस असा पर्यावरण पुरक उपक्रम अन्य शाळांना आदर्श ठरणार आहे.
मुख्याध्यापक डिगंबर महाले यांनी ग्रीन स्कूल, डिजिटलायझेशन व पेपरलेस स्कूलची संकल्पना विशद केली. संचालक मंडळ व शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी करीत असलेल्या सहकार्याबद्दल ऋणनिर्देश व्यक्त केला. दरम्यान, येत्या काळात पुढच्या पिढीला आदर्श अशी शाळा उभी करा त्यासाठी मी आमदार निधीतून मोठी मदत करेल असे आश्वासन आमदार अनिल पाटील यांनी या उपक्रमाचे उद्घाटनप्रसंगी दिले. त्यांनी शाळा समितीचे चेअरमन व मुख्याध्यापक यांच्या कामाचे कौतुक केले.
यावेळी शाळेचे चेअरमन मुंदडे म्हणाले की, संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी संचालक मंडळ कायम सकारात्मक असते. संस्थेच्या हितासाठी कधी कधी कटू निर्णय घ्यावे लागतात. ग्रीन स्कूल संकल्पनेसाठी संचालक मंडळ व संस्था दीड लाख रुपये देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक पी.एल.मेखा, आर.सी.मोराणकर, एस.एम.बडगुजर, सी.झेड.पाटकरी, एन.एम.पाटील, एस.डी.पाटील, सौ.एन.आर.वानखेडे, शाळेचे माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कोरोना मुळे सर्वच विद्यार्थ्यांना कार्यक्रमाला उपस्थित राहणे शक्य नसल्याने ऑनलाईन (गुगल मिट) च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घरबसल्या कार्यक्रमाचा आनंद घेता आला. शिक्षक अमित पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उपमुख्याध्यापक ए.एस.करस्कार यांनी आभार मानले.
