येत्या १७ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय होण्याची शक्यता

मुंबई : राज्यातील शाळा मार्च २०२० पासून कोरोनामुळे बंद आहेत. एकीकडे कोरोनाचं प्रमाण काहीसं नियंत्रणात येत असल्याचं चित्र दिसत आहे. ऑगस्टमध्ये ब्रेक द चैन अंतर्गत जारी झालेल्या नियमावलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला देण्यात आले आहेत. टास्क फोर्सबरोबर झालेल्या बैठकीत शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय शिक्षण विभागावर सोपविण्यात आला होता. त्यानुसार शिक्षण विभागाने आता लवकरच शाळा सुरू करण्याबाबत हालचाली सुरु केल्या आहेत. येत्या आठवड्याभरात शिक्षण विभागाच्या होणाऱ्या बैठकीत राज्यातील शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. संबंधित अधिकाऱ्यांशी बैठकीनंतर राज्यातील शाळा कधी सुरु होणार ? हे स्पष्ट होणार आहे. अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थी आणि शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. योग्य पद्धतीने शिक्षण होऊ शकत नाही. त्यामुळेच प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याच्या मानसिकतेत शिक्षण विभाग आहे.
राज्यातील शाळा कोरोना काळात पूर्णपणे बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय अवलंबावा लागला. त्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच बोर्डांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. नंतरच्या काळात कोरोना रुग्णसंख्या कमी झालेल्या राज्याच्या ग्रामीण भागात आधीच शाळा सुरू करण्याची मुभा राज्य सरकारने दिली असून सध्या ८ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू आहेत. त्यासाठी निर्बंध घालून दिले आहेत. रुग्णसंख्या कमी असणाऱ्या ठिकाणी आता उर्वरित वर्ग लवकरच सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे. येत्या १७ ऑगस्टपासून राज्यातल्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
