साने गुरुजी विद्यालय व गौरीसुत प्रतिष्ठान संस्थेने कोकणात पाच दिवस मदत कार्यात सहभाग नोंदविला

अमळनेरात जमा झालेली मदत चिपळूणला पोहोचली

अमळनेर : अतिवृष्टीमुळे कोकणातील चिपळूण शहराचे मोठे नुकसान झाले. अन् सोशल मिडियाच्या माध्यमातून बातमी पोहोचली. चिपळूण शहरात पाणी-पातळीत झालेली वाढ, त्यातून नागरिकांचे अतोनात हाल करणारी ठरली. प्रत्येक कुटुंबियांचे झालेले सांसारिक व वाणिज्यक नुकसान स्वाभिमानी कोकणी माणसाला कोलमडून पडायला पुरेसे होते. त्यात भर पडली ती संततधार पावसाची. यामुळे अनेकांची दैना उडालीच परंतु
अन्न-पाण्यावाचून माणसं अक्षरशा हवालदिल झालेली पहावयास मिळाली. या अस्मानी नैसर्गिक संकट काळात कोकणी माणूस कोलमडून पडला पण पुरोगामी विचारांचा संस्कारी महाराष्ट्र या धक्क्यातून सावरण्यासाठी तात्काळ पुढे सरसावला. ही महाराष्ट्रीय माणसांसाठी लाख मोलाची बाब ठरली.

या परिस्थितीचे भान ठेवून सानेगुरुजी शाळा संस्थेचे सचिव संदीप घोरपडे यांनी बैठक घेऊन शाळेतील शिक्षक, अध्यक्ष हेमकांत पाटील यांना ‘आपण या घटकेला अतिशय संयमाने मदत कार्यात सहभाग नोंदवू या’ असा मुद्दा मांडला. त्यास अनुसरुन अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आपत्ती व्यवस्थापन कक्ष, मुंबई यांचेशी संपर्क साधून अतिवृष्टी बाधितांची सद्यस्थिती जाणून घेतली. मदत कोणत्या स्वरूपात असावी ? कोणत्या भागात पोहोचवावी ? आदी माहिती घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या निलम पालव या अनुसया महिला स्वयंसेवी संस्था चालवितात त्यांना विनंती करून गरजवंतांचे सर्वेक्षण पाहणी अहवाल आम्हाला द्यावा व आम्ही कोणापर्यंत कशा स्वरुपाची मदत पोहोचवली पाहिजे ? याचीही माहिती जाणून घेतली. त्यानंतर साने गुरुजी विद्यालय आणि गौरीसुत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेरातील नागरिकांना मदतीचे आवाहन केले. हे आवाहन करताना नागरिकांना आश्वस्त केले की, आपण देऊ केलेली मदत आमच्या दोन्ही संस्थांमार्फत कोकणात पोहोचविण्यासाठीचा ट्रक व त्याचा दळणवळणाचा खर्च उचलणार. दोन्ही संस्थेतील पदाधिकारी व साने गुरुजी शाळेतील शिक्षक स्वखर्चाने कोकणात स्वयंसेवक या नात्याने जाऊन गरजवंतांना ही मदत स्वहस्ते देतील. नागरिकांनी या आवाहनास भरभरुन प्रतिसाद दिला.

साने गुरुजी शाळेत किराणा सामानाचे किट, नवे जुने कपडे, अंग पुसण्याचे नवे रुमाल, अंथरूण-पांघरूण, संसारोपयोगी भांडे जमा केले. यात, मंगल देव ग्रह संस्थान, गजानन महाराज परिवार, संभाजी ब्रिगेड यांचेही मोठे योगदान लाभले. साने गुरुजी विद्यालय व गौरीसुत प्रतिष्ठान संस्थेचे पदाधिकारी यांनी जमा झालेली मदत ट्रकमध्ये भरून मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, नगरसेवक श्याम पाटील, संजय चौधरी आदींच्या उपस्थितीत ट्रक रवाना झाला. स्वयंसेवकांनी पाच दिवस कोकणात जाऊन प्रत्यक्ष घटनास्थळी मदतकार्य केले. अनुसया महिला संस्थेच्या पदाधिकारी निलम पालव, साक्षी पालव, रोहित शंकर भारदे यांनी खानदेशातील स्वयंसेवकांची तेथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली.

अनुुुभव मांंडताना संदीप घोरपडे म्हणाले की, प्रत्यक्ष परिस्थिती नजरेसमोर ठेवली तर अंगभर दागिने घालून दोन घास खाण्यासाठी हात पसरावे लागतात याचा विषाद अनेकांच्या चेहऱ्यावर पाहिला. नागरिक दोन घोट पाण्यासाठी मदत कार्यातील गाडीच्या मागे धावताना पहावे लागले. आपला वाहून गेलेला संसार सावरणे साठी एक प्लास्टिक बादली द्या अशी आर्त विनवणी हृदय हेलावून गेले. अमळनेर शहरातील एक जुनी गोधडी मिळताच लाखाची लॉटरी लागल्याचा आनंद कुटुंबप्रमुखाच्या चेहऱ्यावर झळकला. अशा अनेक क्षणांनी सर्वांनाच प्रवास व मदत कार्यातील कष्ट विसरायला भाग पाडले. यावेळी स्वयंसेवकात हेमकांत पाटील, संदीप घोरपडे, प्रशांत निकम, शुभम निकम, अनिकेत घोरपडे व राज पाटील यांनी परिश्रम घेतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!