अपंगत्वावर मात करत लेखणीसाठी धडपडणारे पत्रकार सुभाष पाटील घोडगावकर

आज अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण

मळनेर येथील चौफेर व्यक्तिमत्त्व असलेले कवी व पत्रकार म्हणजे सुभाष पाटील घोडगावकर. १५ ऑगस्ट १९४७ रोजी त्यांचा जन्म झाला. आज वयाची ७४ वर्षे पूर्ण करुन ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. शब्दांवर प्रेम करणं हा त्यांचा मूळ स्वभाव. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू नवकवी, लेखक, पत्रकार यांना मार्गदर्शक व प्रेेेरणादायी आहेेत. तरुणाईतच नव्हे तर अपंंगत्व आल्यानंतर वयाच्या सत्तरीतही शहरात फेेरफटका मारणं… विविध घडामोडींवर बोलत राहणं, असं व्यक्तिमत्व म्हणजे सुभाष पाटील घोडगावकर. त्यांचेकडे एखाद्या कवी, लेखकाबद्दल आणि त्यांच्या साहित्याबद्दल वैैैचारिक खजिना आहे. काहीही विचारा.. त्यांचे तोंडून ज्ञानाचा झरा अखंड वाहू लागतो. गेली अनेक वर्ष ते विविध विषयावर लेखन करीत आहेत.

सुभाष पाटील घोडगावकर यांची आतापर्यंत नऊ पुस्तके प्रकाशित झाली असून यात पाऊलखुणा, वेदना, वसंत वादळ, कडू-गोड, ऊन सावली अशी उत्कृष्ट पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ऊन सावली या पुस्तकाचे महाराष्ट्र शासन १४ भाषेत प्रकाशन करणार आहे. त्यांच्या कविता साध्या सोप्या, आशय संपन्न असतात यामुळे लगेचच त्या वाचकांच्या पसंतीस उतरतात. “हिरवा शेला” या मराठी चित्रपटासाठी त्यांनी काही गाणी लिहिली आहेत. अचानक झालेल्या अपघातात यांचा एक उजवा पाय व उजवा हात निकामी झाला आणि सारं काही स्वप्न कोलमडलं. अपंगत्वावर मात करत हा माणूस लेखणी साठी धडपडत राहिला. आणि अखेर “वाळूचे कण रगडिता…” या उक्ती सार्थ ठरवत डाव्या हाताने लिखाणाची सवय करून घेतली. आपली जिद्द व चिकाटी सोडली नाही. ते विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी असून एक शासन मान्य पत्रकार आहेत. सन १९९१ मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील मिळाला आहे. विविध वृत्तपत्रांतून चौफेर लिखाण त्यांनी केले आहे. यातले अंधारातील दिवे, चैतन्याचे झरे ही सदरे गाजली. या व्यक्तिमत्वाची दखल घेत सन २००२ मध्ये त्यांची जळगाव जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. ते साक्षरता समितीचे सदस्य असून विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून देखील काम केले आहे. त्यांचे भावी जीवनासाठी दिव्यचक्र परिवारातर्फे शुभेच्छा..!

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!