भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षास सुरुवात करून लोकशाही अधिक बळकट करण्याचे केले आवाहन
विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी पार पाडलेल्यांचा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार
जळगाव : भारतीय स्वातंत्र्याचा ७४ वा वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. कोरोना विषाणूला जिल्ह्यातून हद्दपार करण्याबरोबरच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करुन जिल्हा विकासाच्या बाबतीत अग्रेसर राहील, याकरीता प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलतांना केले. सुरुवातीला जळगाव पोलीस दलाच्या पथकाने पालकमंत्र्यांना मानवंदना दिली तर बॅण्ड पथकाने राष्ट्रगीताची धून वाजविली. जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रंजनाताई पाटील, महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी श्रीमती नेहा भोसले, जळगाव शहर महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, शुभांगी भारदे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता श्रीमती गाजरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, तहसीलदार सुरेश थोरात यांचेसह स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, कोरोनायोध्दे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना पालकमंत्री ना. पाटील म्हणाले की, आपल्या देशाच्या स्वातंत्र्याकरीता अनेकांनी आपले बलिदान दिले आहे. अनेक ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. या स्वातंत्र्य सैनिकांच्या सर्वांगीण प्रयत्नांमुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला पुढील वर्षी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय स्वातंत्र्यासाठी ही मोठी अतुलनीय बाब ठरणार आहे. भारताच्या स्वातंत्र्याबरोबर जगातील अनेक देशांना स्वातंत्र्य मिळाले. या देशांनी सुरवातीला लोकशाहीचा स्वीकार केला. कालांतराने या देशांना लोकशाहीची मूल्य जोपासता आली नाहीत. ती मूल्ये आपल्या भारत देशातील प्रत्येक नागरिकाने जोपासली आहेत. त्यामुळेच भारतासारखा विशालकाय देश एकसंघ राहू शकला. ही सर्व कमाल आपल्या लोकशाहीची आहे. म्हणूनच आपण आजपासून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवास सुरुवात करून लोकशाहीला आणखी बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले.
शेतकरी राजा अत्यंत बिकट अवस्थेत असल्याने राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असा विश्वास ना.गुलाबराव पाटील यांनी दिला. आजपासून जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ई-पीक पाहणी या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची अंमलबजावणी होत आहे. कोरोना विषाणूमुळे राज्याच्या उत्पन्नात घट झाली असून तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. कोरोना कालावधीत आई-वडिल गमावलेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. कोरोना लॉकडाऊन काळात बांधकाम मजूर, घरेलू कामगार, ॲटोरिक्षा चालकांना मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारने भरीव मदत जाहीर केली. नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला. शासनाच्या विविध योजनेतंर्गत लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असेही त्यांनी सविस्तर सांगितले.
जिल्ह्यात सिंचन, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण यासारख्या सुविधांवर भर देऊन जिल्ह्यातील नागरीकांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्यात येत आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून २०२४ पर्यंत राज्यातील प्रत्येक घरापर्यंत सर्वत्रच व मुबलक पाणी पोहचविण्याचे उद्दिष्ठ पाणीपुरवठा विभागाने ठेवले आहे. पाऊस नसल्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे जिल्हावासियांना आवाहन केले. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी पार पाडलेल्यांचा पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सरिता खाचणे आणि अपूर्वा वाणी यांनी केले.