मारवड : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मारवड अंतर्गत विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार ( दि.९ ) रोजी मारवड महाविद्यालयात ‘जागतिक आदिवासी दिवस’ या विषयावर ऑनलाईन पद्धतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. वसंत देसले होते. याप्रसंगी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सतीश पारधी यांनी ‘आदिवासींचे मूलभूत अधिकार’ या विषयावर आपले विचार मांडून मौलिक असे मार्गदर्शन केले.
आपले विचार मांडताना प्रा. डॉ. सतीश पारधी म्हणाले की.. जल, जंगल आणि जमीन हा आदिवासींचा मूलभूत अधिकार होता आणि त्यावर मानवाने हस्तक्षेप केल्यामुळे दुर्दशा झालेली आहे. ही दुर्दशा कशी झालेली आहे ? यावर त्यांनी विशेष प्रकाश टाकला. तसेच आदिवासी बांधवांना आपलेपणाची वागणूक देऊन त्यांना प्रगत समाजाबरोबर शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे या विषयाची जाणीव व जागृती करणारे विचार त्यांनी आपल्या व्याख्यानातून मांडलेत.अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य मा. डॉ. वसंत देसले यांनीही आदिवासी बांधवांच्या प्राचीन व सद्यस्थितीवर प्रकाश टाकला. आदिवासी बांधवांच्या पराक्रमी परंपरेचा उजाळा दिला. महाविद्यालयात प्रवेशित आदिवासी विद्यार्थ्यांचे तोंडभरून कौतुक करत त्यांना भावी आयुष्याविषयी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. संजय महाजन यांनी केले. तर महाविद्यालयातील कार्यक्रमाचे आयोजक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. संजय पाटील यांनी आभार मानलेत. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले. ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व मारवड महाविद्यालयाचे अध्यक्ष आबासाहेब जयवंतराव पाटील आणि संचालक मंडळ यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्यात.