पार्थिवाला मुलासह, दोघी लेकी आणि नातीने दिला अग्निडाग
धुळे : येथील पुरोगामी विचारांचे ज्येष्ठ पत्रकार, दैनिक “मतदार”चे संपादक जगतराव सोनवणे उर्फ नाना यांचे गुरुवारी (दि.१२) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी धुळ्यातील देवपूर स्मशानभूमीत कोणत्याही कर्मकांडांविना, साध्या पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा ऋषीसह दोन्ही मुली दीपाली व सोनाली तसेच नात सिद्धी यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्निडाग दिला. अश्माने मडक्याला भोक पाडून चितेवरील मृतदेहाभोवती प्रदक्षिणा घालून मागे न पहाता मडके खांद्यावरून मागच्या अंगाला टाकून फोडण्याचा विधीही टाळण्यात आला. या निमित्ताने समस्त समाजाने आदर्श घ्यावा असं धाडसी व क्रांतिकारी पाऊल टाकण्यात आलं.
नानांचा देह अनंतात विलीन झाल्यानंतर दहावे, अकरावे, बारावे, तेरावे, श्राद्ध, पिंडदान, अस्थिविसर्जन, शांतोदक (निधन शांतिविधी) यासह कोणतेही विधी करण्यात येणार नाहीत. आयुष्यभर पुरोगामी विचारसरणी अंगीकारून, कर्मकांडांवर प्रहार करणाऱ्या नानांच्या इच्छेनुसार अंत्यसंस्कार प्रसंगीचे सर्व कर्मकांड टाळण्यात आले. नानांच्या पत्नी चंद्रकलाताई यांच्यासह कुटुंबीय आणि जवळच्या सर्व नातेवाईकांनीही नानांच्या इच्छेचा आदर राखत अनावश्यक विधी टाळले. नानांच्या अस्थी व राख मिसळून घराच्या प्रांगणात; तसेच शेतात वृक्षारोपण करून त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यात येणार आहेत.
अंत्यसंस्कारप्रसंगी नानांचे हितचिंतक, समकालीन सहकारी, त्यांच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते, पत्रकार, नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी नानांच्या कार्याच्या आठवणी जागविण्यात आल्या. भास्कर वाघ प्रकरणात त्यांनी अनेक संकटे, हल्ले परतवून, ज्या धैर्याने सारे सत्य समोर आणले, त्यातील अनेक ज्ञात-अज्ञात पैलू यावेळी उलगडले. समस्त अधिकारी वर्गातर्फे अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यावेळी उपस्थित होते. दिव्यचक्र परिवारातर्फे नानांना भावपूर्ण आदरांजली !