अमळनेर येथे ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ कथासंग्रहाच्या तृतीय आवृत्तीचे प्रकाशन संपन्न

दिग्गज साहित्यिकांच्या वाड्मयीन चर्चा व सहवासातून मन संस्कारित : लेखक विश्वास ठाकूर

अमळनेेर : महाविद्यालयीन जीवनात पु.ल.देशपांडे, शिवाजी सावंत, तात्यासाहेब शिरवाडकर यासारख्या दिग्गज साहित्यिकांच्या वाड्मयीन चर्चा व सहवासातून मन संस्कारित झाल्यानेच ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ कथासंग्रह लिहिण्याचे धाडस मी करू शकलो !’ असे प्रतिपादन लेखक विश्वास जयदेव ठाकूर यांनी कथासंग्रहाच्या तृतीय आवृत्ती प्रकाशन प्रसंगी व्यक्त केले. अमळनेर येथील मराठी साहित्य परिषद, पुज्य साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आणि मराठी वाड्मय मंडळ यांच्या सहकार्याने रोटरी हॉल येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य प्राचार्य तानसेन जगताप यांचे शुभहस्ते कथासंग्रहाच्या तृतीय आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून साहित्यिक डॉ. मिलिंद बागूल होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य तानसेन जगताप यांचेसह म.वा.मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष कवी रमेश पवार, साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, संयोजन समिती सदस्य वेदांशू पाटील, संदीप घोरपडे, रणजित शिंदे, प्रा.लिलाधर पाटील, प्रकाश वाघ आदि मान्यवर उपस्थित होते.

आपले अनुभव कथन करताना श्री ठाकूर पुढे म्हणाले की, माझ्या लिखाणाला मधू मंगेश कर्णिक व साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी दिलेला प्रतिसाद मला बळ देऊन गेला. शब्द मल्हार प्रकाशनचे संपादक स्वानंद बेदरकर व माझे मित्र विनायक रानडे यांच्याशी झालेल्या चर्चेतून हा कथासंग्रह प्रत्यक्ष वाचकांपर्यंत पोहचवता आला. साने गुरुजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अमळनेर नगरीत तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन होणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचेही ते म्हणाले.

अध्यक्षीय मनोगतात साहित्यिक डॉ. मिलिंद बागूल यांनी ठाकूर यांचा कथासंग्रह अत्यंत वाचनीय असून आपले अनुभव मांडण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे. त्यांनी आपल्या समग्र आयुष्यातील अनुभव यापुढेही मांडावे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्राचार्य तानसेन जगताप यांनी कथासंग्रहातील विविध कथांचा आढावा घेत ठाकूर यांनी आपले अनुभव रसिकांसमोर मांडणे सतत सुरू ठेवावे असे मत व्यक्त केले. यावेळी प्राचार्य तानसेन जगताप यांच्या हस्ते साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक आबा महाजन यांचा गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विश्वास ठाकूर यांनी लिहिलेल्या कथा म्हणजे बँकिंग क्षेत्रात काम करीत असताना त्यांना आलेले अनुभव व त्या माध्यमातून ते रसिकांना देत असलेली अनुभूती याचा दिव्य संगम असल्याचे मत शब्द मल्हार चे स्वानंद बेदरकर यांनी मांडले. याप्रसंगी जेष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील, तहसीलदार सुदाम महाजन, आकाशवाणी केंद्र संचालक अनिरुद्ध कांबळे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक वेदांशू पाटील यांनी केले तर मान्यवरांचा परिचय संदीप घोरपडे, प्रा.लिलाधर पाटील यांनी करून दिला. संयोजन समिती सदस्य सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी आभार व्यक्त केले. सौ.वसुंधरा लांडगे यांनी गायिलेल्या साने गुरुजी लिखित ‘खरा तो एकची धर्म’ या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात तर पसायदानाने समारोप झाला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विश्वास बँकेचे अतुल खैरनार, जिल्हा बँक संचालिका सौ.तिलोत्तमा पाटील, पत्रकार जितेंद्र ठाकूर, मुन्ना शेख, अंबिका टेेन्ट चे संचालक कैलास पाटील, युवा कार्यकर्ते निलेश वाघ, अमोल संदानशिव, हितेश बडगुजर, राहुल पाटील, चिन्मय पाटील, अमळनेर महिला मंच, प्रतिक जैन रोटरी क्लब, ठाकूर समाज मंडळ आदींनी परिश्रम घेतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!