कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर अंतर्गत उपबाजार पातोंडा येथे पेट्रोल पंपाचे भूमिपूजन संपन्न

‘सत्ता’ हे साधन असून त्याचा उपयोग जनकल्याणासाठीच केला पाहिजे : जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील

अमळनेर : ” सूर्यफुलाचा चेहरा जिकडे ऊन तिकडे फिरत असतो तसेच काही लोक स्वार्थासाठी (सत्ता) सूर्यफुलासारखे फिरताहेत. ‘सत्ता’ हे साधन आहे त्याचा उपयोग जनकल्याणासाठीच केला पाहिजे ” असे मत महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. रविवार, दि.१९ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर अंतर्गत उपबाजार पातोंडा येथे इंडियन ऑयल पेट्रोल पंपाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. सोबत व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेरच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमाताई पाटील, जिपचे माजी अध्यक्ष गोरख तात्या पाटील, प्रशासक प्रा.सुरेश पाटील, जळगाव जिल्हा काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हा अध्यक्षा सुलोचनाताई वाघ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ पाटील, शिवसेना तालुकाध्यक्ष विजय पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, संभाजी पाटील, जितेंद्र राजपूत, एल.टी.पाटील, भाईदास अहिरे, केदार पवार, हरी भिका वाणी, निवृत्त पोलिस अधीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी, पातोंडा सरपंच भरत बिरारी, आदी उपस्थित होते.

मुख्य प्रशासक तिलोत्तमाताई पाटील व संपूर्ण प्रशासक मंडळाच्या वतीने शेतकऱ्यांच्या हित लक्षात घेऊन अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध उपायांची अंमलबजावणी केलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पातोंडा उपबाजार येथे पेट्रोल पंपाचे भूमिपूजन करण्यात आले. शेतकऱ्यांना त्यांचे धान्य चाळण करून अधिकाधिक भाव मिळावा यासाठी आवारात असलेल्या धान्य चाळणी यंत्राचे व माती परिक्षण मशीनचे देखील यावेळी उद्घाटन करण्यात आले. माती परिक्षण मशीन उपलब्ध झाल्याने अत्यंत माफक दरात शेतकऱ्यांना माती परीक्षण करणे सोयीचे होईल.

पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, ज्याप्रमाणे आपल्या शरीराची योग्य ती देखभाल केली जाते त्याचप्रमाणे जमीन शेतीपुरक असण्यासाठी माती परिक्षण तितकेच महत्वाचे आहे. अनेकांचा कल आता शेतीकडे वळू लागला आहे. माणसांची व नेत्यांची श्रीमंती ही कार्यकर्त्यांवर अवलंबून असते. जर कार्यकर्त्याने ठरविले तर नेत्याला खाली जमिनीवर आणू शकतो. ‘सत्ता’ हे साधन आहे त्याचा उपयोग जन कल्याणासाठीच केला पाहिजे. स्वतः चा स्वार्थ साधत बसलो व सत्तेची पदे घरातच वाटत बसलो तर वाईट प्रसंग ओढवतात. त्यामूळे मी जळगाव जिल्ह्यात जास्तीत जास्त निधी आणून देत आहे. जिल्ह्यात ५०० कोटींची पाणी पुरवठा योजना आणून थेट जनतेपर्यंत पाणी पोहोचविणार आहे. धंदेवाईक माणूस नुकसान झालंच तर धंदा बदलतो. पण माझा शेतकरी ‘शेती’ हाच कायमचा धंदा मानतो. कितीही नुकसान झालं तरी शेतात राब राब राबतो. जीवनात काही नुकसानीच्या घटना या घडतच असतात. पण, चूकीचा मार्ग निवडून आत्महत्या करणं हे गांडूपणाचं लक्षण आहे. शेतकऱ्यांसाठी डीपीडीसी योजनेतून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातील. पक्षांतर्गत कुरघोडी करण्यापेक्षा चांगले काम करणाऱ्याच्या पाठीशी उभे राहणं ही आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार अनिल पाटील म्हणाले की, अमळनेेर बाजार समितीत पक्षभेद न ठेवता विकासासाठी तीन राजकीय पक्षांचं प्रशासक मंडळ नेमण्यास पालकमंत्री यांनी संमती दिली. अल्पावधीतच मुख्य प्रशासक व सदस्यांनी तो विश्वास सार्थ ठरविला. पाणी पुरवठाचे योग्य नियोजन करुन चार पाणी पुरवठा योजनांना मंजूरी दिली. याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तालुक्याचे वतीने त्यांनी आभार मानले. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे परिसरातील पातोंडा, रुंधाटी, मठगव्हाण, गंगापुरी, मुंगसे, दापोरी आदी गावांतील शेतीमध्ये पाणी साचून राहते. यावर कायमचा पाण्याचा निचरा होण्यासाठी काय उपाय करता येतील ? याबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले.

माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे , इंडीयन ऑईलचे आश्विन यादव, एजी ट्रान्सचे व्यवस्थापकीय संचालक अजय पाटील यांनीही थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमाताई पाटील यांनी प्रास्ताविकात आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत झालेल्या विकासकामांचा पाढा वाचला. पणन महामंडळाच्या १०० टक्के अनुदानावर पेट्रोल पंप मंजूर करण्यात आला होता. परंतु आधीच्या प्रशासकांनी कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता न केल्याने हा पंप नाकारण्यात यावा असा शेरा प्रोसिडींगवर होता. तेथूनच लोकप्रतिनिधी, सर्व सदस्य, कर्मचारी यांच्या मदतीने हे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्या प्रयत्नांचे हे फलित असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार संजय पाटील यांनी सुत्रसंचलन व आभार मानले. कार्यक्रम प्रसंगी अमळनेर राष्ट्रवादी महिला ग्रुप, विविध संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कृ.उ.बा.समिती सचिव व कर्मचारी वृंद, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!