
अमळनेर : तालुक्यात नजर आणेवारी कमी करावी व सरसकट दुष्काळी अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी काँग्रेस कमिटी तर्फे नुकतेच उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. सुरुवातीस दीड महिने तालुक्यात पाऊस न झाल्याने साधारणत: १५ जुलैनंतर पेरण्या सुरु झाल्या. त्यानंतरच्या काळात पावसात खंड पडल्याने पिकांची वाढ खुंटून त्याचा पिकांवर परिणाम झाला. १८ ऑगस्ट नंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. मात्र, सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. खरीपातील पिके उभरण्यास (मर रोग) सुरुवात झाली. ज्वारी, बाजरी, गहू, मका, कापूस आदी पिकांवर रोगराई पसरली. जास्तीच्या पावसामुळे कपाशीवर लाल्या रोग व बोंडअळी चा प्रादुर्भाव होवून मोठे नुकसान झाले. येणारे उत्पन्न येईलच याची शाश्वती नाही. त्यामुळे लावलेली नजर आणेवारी ५२ पैसे अवास्तव असल्याने ती कमी करण्यात यावी व सरसकट दुष्काळी अनुदान जाहीर करण्यात यावे नुकसान भरपाई अनुदानासाठी शासन स्तरावर प्रयत्न करुन त्यासंदर्भात लवकर निर्णय घेऊन शेतकर्यांना दिलासा द्यावा अशी मागणी काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आलेली आहे.
यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक मनोज पाटील, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, किसान सेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष संभाजी पाटील, बन्सीलाल भागवत, प्रताप पाटील, प्रा.शाम पवार, सईद तेली, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष महेश पाटील, अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्ष अलीम मुजावर, युवक काँग्रेस शहराध्यक्ष तौशिफ तेली, शहर कार्याध्यक्ष कुणाल चौधरी, युवक काँग्रेस सचिव मयुर पाटील, चिटणीस राहुल गिरासे, अल्पसंख्यांक उपाध्यक्ष राजू भाट, बळवंत पाटील आदी उपस्थित होते.
