
जळगांव : मोदी सरकारच्या दिवाळखोर आणि देश बुडव्या धोरणा विरोधात सोमवार, दि.२७ सप्टेंबर २०२१ रोजी संयुक्त किसान मोर्चाने भारत बंद ची हाक दिली आहे. राज्यात हा बंद यशस्वी करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, मार्क्सवादी कम्युनिट पक्ष, आदी राजकीय पक्ष व विविध जन संघटनांनी बंदचे आवाहन केलेले आहे. जनविरोधी ३ कृषी कायदे व ४ श्रम संयुता रद्द करा, वीज दुरुस्ती विधेयक मागे घ्या, संपूर्ण उत्पादन खर्चाच्या दीड पट हमी भाव शेतकऱ्यांना मिळावा यासाठी केंद्रीय कायदा करा, खाजगीकरणाचे धोरण बंद करा, डिझेल-पेट्रोल-गॅस इत्यादी इंधनाचे दर कमी करा, नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा, लोकशाही धर्मनिरपेक्षता आणि देशाच्या संविधानाचे रक्षण करा आदी प्रमुख मागण्या आहेत.
शेतकरी, कामगार, दलित, आदिवासी, शेतमजुर, कर्मचारी, विदयार्थी, शिक्षक, महिला आदींनी मोदी सरकार विरोधात बंद पुकारलेला आहे. जळगांव जिल्ह्यातील जनतेने या भारत बंद मध्ये स्वयंपूर्तीने सहभाग घ्यावा असे आवाहन महाविकास आघाडी, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा, माकप, भाकप, प्रहार जनशक्ती पक्ष, छावा युवा मराठा महासंघ, संविधान जागर समिती, पूरोगामी संघटनांनी केलेली आहे. बंद यशस्वीतेसाठी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, नगरसेवक अशोक लाडवंजारी, नगरसेवक राजू मोरे, संविधान जागर समिती संयोजक भारत ससाणे, कादरीया फाऊंडेशनचे फारुख कादरी, कॉ.विजय पवार, छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, युवक प्रहार जनशक्ती पक्ष अध्यक्ष निलेश बोरा परिश्रम घेत आहेत.