
चोपडा : शहरातील श्रीराम नगर भागातील संत जगनाडे महाराज मंदिर येथे यूपीएससीच्या परीक्षेत IAS रॅ॑कसाठी १८२ व्या क्रमांकाने यश संपादन करुन महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा बहुमान मिळालेल्या गौरव रवींद्र साळुंखे व कुटुंबियांच्या सत्काराचे आयोजन दिनांक २५ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चोपडा येथील प्रताप विद्यामंदिर चे निवृत्त मुख्याध्यापक विद्यावाचस्पती टी.एम.चौधरी होते. सोबत संस्थेचे अध्यक्ष के.डी.चौधरी, सौ.सीमा सुनील चौधरी, सुनील चौधरी, प्रशांत चौधरी, नारायण चौधरी होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते गौरव चा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. गौरव सोबत त्याचे वडील रवींद्र साळुंखे व मातोश्री सुरेखा साळुंखे यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. रविंद्र साळुंखे हे चोपडा तालुक्यातील वेले येथील रुक्मिणीबाई माध्यमिक शाळेत शिक्षक असून गौरव हा त्यांचा मुलगा आहे.
सत्काराला उत्तर देताना गौरव ने टी.एम.चौधरी सरांनी केलेले मोलाचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या परिश्रमाची आठवण करून दिली. या यशाचे श्रेय देखील चौधरीसर व माता-पित्यांना दिले. मी प्रथम देशाचा सेवक असल्याची भावना कायम लक्षात ठेवेल. देशाची सेवा करताना सर्वसामान्य जनतेला न्याय देऊ व तळागाळातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध राहू असे आश्वासित केले.
अध्यक्ष पदावरून बोलताना टी.एम. चौधरी म्हणाले की, गौरव अधिकारी म्हणून काम करत असताना महाराष्ट्राचा सचिव म्हणून वैभवात भर टाकेल. संस्थेचे अध्यक्ष के.डी.चौधरी यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत चौधरी व सीमा चौधरी यांनी आभार मानले. श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा व महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चोपडा या संस्थेचे पदाधिकारी व समाज बांधवांनी गौरवच्या यशाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रदेश तेली महासंघ तालुकाध्यक्ष प्रशांत चौधरी, ह.भ.प. गोपीचंद महाराज, देवकांत चौधरी यांनी परिश्रम घेतले. दिव्यचक्र परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !