सामाजिक संस्थांनी केला कोरोना योद्धांचा सन्मान

कोरोना काळात योगदान देणाऱ्यांप्रती व्यक्त केले ऋण

अमळनेर : येथील अमळनेर महिला मंच ट्रस्ट आणि आधार बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने कोरोना योद्धांच्या सन्मानाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर अपर्णा मुठे होत्या. व्यासपीठावर माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, आधार संस्थेच्या अध्यक्षा डॉ.भारती पाटील, अमळनेर महिला मंचच्या उपाध्यक्षा तिलोत्तमा पाटील, आधार संस्थेच्या कार्यकारी संचालिका रेणू प्रसाद, डॉ.अनिल शिंदे आदी उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी देवता चे पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. वसुंधरा लांडगे यांनी कोरोना वर आधारित जाणीव जागृतीपर गीत सादर केले. डॉ.भारती पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कोरोनाला हरविण्यासाठी अमळनेर शहरात ज्यांनी योगदान दिले त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करण्यासाठी आजचा उपक्रम असल्याचे त्यांनी प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमास शहरातील नामवंत डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य सेवक, आधार संस्थेचे कार्यकर्ते सन्मानार्थी म्हणून उपस्थित होते. सन्मानार्थींमध्ये डॉ. बी.एस.पाटील, डॉ. अविनाश जोशी, डॉ. अनिल शिंदे, डॉक्टर निखील बहुगुने, डॉ. संदीप जोशी, डॉ. किरण बडगुजर, डॉ. प्रकाश ताळे, डॉ. जी एम पाटील, डॉ. विलास महाजन, डॉ. प्रशांत शिंदे, डॉ. आशिष पाटील, डॉ. विक्रांत पाटील, डॉ. हेमंत कदम, डॉ. सुशीलकुमार बडगुजर, डॉ. देवयानी बडगुजर, डॉ. राजेंद्र शेलकर यांचा समावेश होता.

वैद्यकीय अधिकारी यांच्यावतीने डॉ.अविनाश जोशी, डॉ.अनिल शिंदे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.
परिचारिका भगिनींच्या वतीने प्रतिभाताई नेरकर यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने अश्वमेघ पाटील यांनी कोरोना जाणीव जागृती कविता सादर केली. डॉ.बी.एस.पाटील यांनी कोरोना विषयी जनजागृती करण्यात मोलाची भूमिका निभावणाऱ्या डॉक्टरांचे अभिनंदन केले. आता आपल्याला कोरोना सोबतच जगायचे असून सर्व काळजी घेऊन आपण तशी तयारी ठेवली पाहिजे आणि सर्वात जास्त विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे त्याकरिता शाळा लवकरात लवकर सुरू केल्या पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय मनोगतात डॉक्टर अपर्णा मुठे यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवणाऱ्या सैनिकांचे मनोधैर्य खचू न देणाऱ्या व्यक्तींचे मनापासून स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आधार संस्थेच्या अश्विनी भदाणे आणि अमळनेर मंचच्या पद्मजा पाटील यांनी केले. उज्वला शिरोडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्या हजारे, कलीम खान, तौसिफ शेख, वैशाली सैंदाणे, संजय कापडे, मनीषा खैरनार, राहुल पाटील यांचे सहकार्य लाभले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!