
धुळे : साक्री तालुक्यातील निजामपूर जवळील जावदे या गावी ज्ञानेश्वरी पारायणाच्या समाप्तीचे किर्तनात तल्लीन असतांना हभप ताजुद्दीन महाराज यांची हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने प्राणज्योत मालवली. ज्ञानेश्वरी पारायणाच्या समाप्तीचे किर्तन करीत असतांना अचानक ते खाली बसले. यानंतर काही क्षणातच ते सहकारी किर्तनकाराच्या मांडीवर कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार करण्यापुर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.
जामदे गावात ज्ञानेश्वर पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी सोमवारी रात्री वारकरी सांप्रदायाचे गाढे अभ्यासक हभप ताजुद्दीन शेख यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या किर्तनाला सुरुवात करताना शेख यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानेश्वरीमधील एका अभंगावर निरुपण केले. किर्तन अखेरच्या टप्प्यात आले असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते खाली बसले. काही क्षणातच ते किर्तनकार सहकाऱ्याच्या मांडीवर कलंडले. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलविले. पण त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. किर्तन सुरु असतांना अचानक हभप शेख हे मंचावर कोसळल्यानंतर सहकाऱ्यांनी हरीनामाचा गजर सुरू ठेवला होता. ही बाब समजल्यानंतर सर्वत्र शोककळा पसरली.
हभप ताजुद्दीन महाराज यांनी वारकरी व संत साहित्याचा प्रचार व प्रसार करण्याचे काम केले. महाराष्ट्रासह गुजराथ, कर्नाटक व मध्यप्रदेश तसेच गोवा राज्यात आपली किर्तनसेवा दिली आहे. ते उत्तम गायनाचार्य होते. संस्कृत व संत साहित्यावर त्यांचा गाढा अभ्यास होता. औरंगाबाद जिल्हयात त्यांचे वास्तव्य होते. त्यांच्या मूळगावी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने वारकरी संप्रदायातून शोक व्यक्त केला जात आहे.