पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व वाचनालयाचा स्तुत्य उपक्रम
अमळनेेर : वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून येथील सानेगुरुजी ग्रंथालय व वाचनालयातर्फे जास्त पुस्तके वाचन करणाऱ्या वाचकांचा नुकताच सत्कार करण्यात आला. सानेगुरुजी ग्रंथालयात वाचक सभासद असलेल्या आणि जास्तीत जास्त पुस्तके वाचणाऱ्या वाचकांतून तीन जणांची निवड करणेत आली. यात, निवृत्त शिक्षक गं. का.सोनवणे, गृहिणी सौ.मंगला मोरे, कु.गायत्री रमेश शिंदे यांचा समावेश आहे. या तिघांची निवड सार्थ असल्याचे बोलले जात आहे. सत्कार प्रसंगी सानेगुरुजी ग्रंथालय व वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, प्रकाश ठाकूर, भाऊसाहेब देशमुख, संदीप घोरपडे, रणजित शिंदे, अरविंद सोनटक्के आदी उपस्थित होते.
नुकतीच वयाची ८७ वर्षे पूर्ण करुनही हातात लहानशी बॅग घेऊन शहरात पायी फिरणारे ज्येष्ठ निवृत्त शिक्षक गं. का.सोनवणे (काका) अनेकांना परिचित आहेत. त्यांचा नम्र स्वभाव व हसतमुख असणारा चेहरा हीच त्यांची खरी ओळख. सुमारे ५० वर्षांपूर्वी पासून ते सानेगुरुजी ग्रंथालयाचे नियमित वाचक आहेत. स्थानिक तसेच जिल्हा वृत्तपत्रांतून नियमितपणे विविध सदरातून नाविन्यपूर्ण लिखाण करीत असतात. त्यात विषयांचे वैविध्य असते. सुमारे ३५ वर्षे सेवेनंतर आदर्श शिक्षक म्हणून ते सेवानिवृत्त झालेत. वाचन करणे हा त्यांचा एकमेव छंद. आजही चष्म्याशिवाय वाचन करतात. एखाद्याशी चर्चेतदेखील अलीकडे काय वाचत आहात ? हा प्रश्न विचारतात. नवी पुस्तके खरेदी करतांना पुस्तके सुचवतात. त्यांच्या निरोगी आणि सुखावह वार्धक्याच रहस्य पुस्तक वाचनात असावे असे म्हणायला हरकत नाही. अमळनेर उपासना केेंद्रात नेहमीच भारतीय असणारे पद्मेश नाना यांचे ते वडील आहेत.
सौ.मंगला मोरे गृहिणी असूूनही वयाची पन्नाशी ओलांडताना आपली घरकामे आटोपून नियमितपणे वाचन करतात. दर २-३ दिवसांनी पुस्तक बदलून त्या विविध विषयांचे वाचन करतात. सत्कार प्रसंगी मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, ‘पुस्तकांनी मला खूप आधार दिला आहे. रिकाम्या गप्पा गोष्टी, कूचाळक्या करण्यापेक्षा वाचन करणेेच योग्य. माझी मुले चांगली उच्च शिक्षित असूनही वाचन कमी झालेले नाही. वाचन प्रेमामुळेच आज मी माझ्या ८५ वर्षीय सासूबाईंना कार्यक्रमाला घेऊन आलीय. मी त्यांची सेवा करते. त्यांचा सांभाळ करण्याचे संस्कार पुस्तकांनीच माझ्यावर केले असल्याचेही त्यांनी सांगितले.’
सहा महिन्यांपूर्वी वाचक सभासद झालेली कु. गायत्री रमेश शिंदे हिने सहा महिन्यांच्या काळात सुमारे शंभर पुस्तके वाचली आहेत. तिचा हा वाचन वेग साऱ्यांनाच विचार करायला लावणारा ठरला. तिला प्रश्नही विचारण्यात आले. काय काय वाचले ? म्हणून विचारले तर न अडखळता पुस्तकांची नावे सांगितली. कुठलं पुस्तक तुला जास्त आवडले ? या प्रश्नावर तिने चटकन उत्तर दिले… ‘अस्मा’. यामुळे लहान मुलीचे कुतुहल वाटले. तिने व्यासपीठावर लहान वयात सहजपणे उत्तम शब्दात मनोगत मांडणे हे सारं वाचनातून आलेलं दिसत होतं. न घाबरता धीटपणे दिलेली उत्तरे मनाला चटका लावून गेली.
एकंदरीत काय तर… जे वयाने मोठे आहेत त्यांना पुस्तकं जगण्याचा आधार झाली आहेत. जी वयाने लहान आहेत त्यांना पुस्तकं मार्गदर्शक झाली आहेत. तुम्ही वयाच्या कुठल्या टप्प्यावर पुस्तकांचा हात धरतात आणि तो धरलेला हात कुठे सोडून देतात ? यावर तुमच्या आयुष्याचे पुढचे वळण आणि प्रवास अवलंबून असतो.