अमळनेर : येथील ढेकू रोडवरील श्रीराम नगर येथे नगरसेवक तथा आरोग्य सभापती श्याम पाटील यांच्या संकल्पनेतून गुरु शिष्याची महती सांगणारे भक्ती शक्ती स्मारक उभारण्यात आले आहे. शहरात उभारण्यात आलेले संत तुकोबाराय व छत्रपती शिवराय यांचे स्मारक म्हणजे प्रेरणा व समतेचे प्रतीक असल्याचे मत कर्जतचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. आमदार रोहित पवार यांच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन नुकतेच झाले त्यावेळी ते बोलत होते. याचवेळी लोकनेते शरदचंद्रजी पवार अभ्यासिकेचे लोकार्पणही करण्यात आले. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे, मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, मा.नगराध्यक्ष विनोदभैय्या पाटील, नगरसेवक श्याम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, ग्रंथालय सेलच्या रिता बाविस्कर, राष्ट्रवादीचे अनिल शिसोदे, जयवंत पाटील उपस्थित होते.
आमदार रोहित पवार पुढे म्हणाले की, आजच्या काळात ज्ञानाची भूक असायला हवी. पक्ष भेद न करता जाती धर्माच्या नावाने फूट पाडणाऱ्यांना युवावर्गाने मतदानाद्वारे धडा शिकवायला हवा. छत्रपती शिवरायांनी उभारलेले राज्य हे सर्वांना हवेसे राज्य होते. आज विकास कामे होतात पण खरा विकास होताना दिसत नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. राजमुद्रा फाउंडेशन चे विकास काम पाहून आमदार पवार यांनी स्तुतीसुमने उधळली. लक्ष्मीनगर भागातील मृत संदीप रुल्हे यांच्या कुटुंबियांनी संमती दिल्यास त्यांच्या मुलीच्या शिक्षणाची सोय बारामती येथील मुलींच्या होस्टेलमध्ये करून शिक्षणाचा सर्व खर्च करण्याची ग्वाही आमदार पवार यांनी दिली.
सरस्वती विद्या मंदिरातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी श्याम पाटील यांनी प्रभाग ७ मधील झालेल्या विकास कामांचे भरभरून कौतुक केले. यापुढेही नगरपालिकेच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. श्याम पाटील यांनी प्रास्ताविक करताना, समाजकारण व राजकारणाची सांगड घालून विकास कामे करीत असल्याचे सांगितले. सौ.वसुंधरा लांडगे व सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजमुद्रा फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास राष्ट्रवादी व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते, पिंपळे रोड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महात्मा बळीराजा लोकोत्सव समितीतर्फे सत्कार
अमळनेर येथील महात्मा बळीराजा स्मारकाला आमदार रोहित पवार यांनी भेट देत बळीराजाच्या शिल्पाला वंदन केले. बळीराजा समितीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, संदेश पाटील, प्रशांत निकम, जयवंत शिसोदे, मराठा सेवा संघाचे कैलास पाटील, प्रा.विजय गाढे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला. त्यांचेसोबत मा.आ.साहेबराव पाटील, मा.नगराध्यक्ष विनोदभैैैय्या पाटील, नगरसेवक श्याम पाटील उपस्थित होते. रणजित शिंदे यांनी आमदार पवार यांना म.बळीराजा यांच्या स्मारकाचा अल्प परिचय करून दिला. उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘जय जिजाऊ… जय शिवराय’ घोषणा देत परिसरात जल्लोष केला. याप्रसंगी बळीराजा समिती, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते उपस्थित होते.