स्वातंत्र्य ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून त्यासाठी मुक्तिदायी व्यवस्थेची गरज : प्रा.शरद बाविस्कर

अमळनेर : ‘स्वातंत्र्य ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून त्यासाठी मुक्तिदायी व्यवस्थेची गरज आहे, अशी व्यवस्था व त्यासाठी पूरक वातावरण निर्माण करणे ही शिक्षणक्षेत्राची जबाबदारी आहे’ असे मत ‘भुरा’ या बहुचर्चित ग्रंथाचे लेखक तथा जे एन यु नवी दिल्ली येथील फ्रेंच तत्वज्ञानाचे प्राध्यापक शरद बाविस्कर यांनी केले. डॉ.शरद म्हणून वावरत असतांना स्व:शोध घेत व्यवस्थेचे स्वरूप उलगडणारा प्रवास म्हणजे ‘भुरा’ असेही त्यांनी पुढे सांगितले. साने गुरुजी वाचनालय व ग्रंथालय अमळनेर व मराठी साहित्य परिषद शाखा अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने पू.साने गुरुजी वाचनालय सभागृहात आयोजित जाहीर संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य प्रमोद पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाच्या सुरवातीस पू. सानेगुरुजी , महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमांना मान्यवरांनी पुष्प अर्पण केले. यावेळी प्रा.देवेंद्र इंगळे, प्रा.नितीन पाटील, दर्शना पवार, सारांश सोनार, साने गुरुजी ग्रंथालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, सचिव प्रकाश वाघ, मसापचे कार्याध्यक्ष रमेश पवार, प्रा.लिलाधर पाटील, रणजित शिंदे आदी उपस्थित होते.

प्रमुख वक्ते प्राध्यापक देवेंद्र इंगळे म्हणाले की, जात हे भारतातील प्रमुख वास्तव असून मराठीतील बहुतेक साहित्य या वास्तवापासून दूर घेऊन जाणारे असल्यामुळे दुभंगलेल्या साहित्याने साहित्य विश्वाची हानी केलेली आहे. या पार्श्वभूमीवर भुरा हे वास्तवाला भिडणारे महत्वपूर्ण पुस्तक आहे. प्रा.नितीन पाटील म्हणाले की, मराठी आत्मकथनाची एक साहित्यिक परंपरा महाराष्ट्राला लाभलेली असून दलित आत्म कथना नंतर ‘भुरा’ हे या परंपरेला समृद्ध करणारे आत्मकथन आहे.

केवळ शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळवावी हे ‘भुरा’ चे उद्दिष्ट नसून यापलीकडे जाऊन व्यवस्थेची चिकित्सा करायला शिकवणारे हे पुस्तक असल्याचे सांगून दर्शना पवार यांनी महिलांसाठी देखील एक समान परिस्थिती निर्माण करावी असे आवाहन केले. जीवनातील प्रत्येक क्षणाकडे गांभीर्याने व नवीन दृष्टीने पाहायला लावणारे व अंतर्मुख करून प्रेरणा देणारे हे आत्मचरित्र असल्याचे युवा वक्ता सारांश सोनार यांनी सांगितले. सध्या बहुचर्चित होत असलेली ‘भुरा’ ही अनेक अर्थाने महत्वपूर्ण साहित्यकृती असून विविध घटकातील वाचकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे कार्यक्रम संयोजक प्रा.लिलाधर पाटील यांनी सांगितले.

संयोजन समितीचे रणजित शिंदे यांनी प्रास्ताविक करताना, खान्देश च्या मातीशी नाळ जोडलेल्या साहित्यिकांचा जाहीर संवाद अमळनेर च्या साहित्य चळवळीत विकासात मोलाची भर टाकेल असे सांगितले. वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी आभार मानले. अमळनेर चे सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ व चित्रकार डॉ शरद बाविस्कर यांनी लेखक प्रा. डॉ शरद बाविस्कर यांना रेखाचित्र भेट दिले. प्रमोद संदानशिव यांनीही चित्रकृती भेट दिली. यावेळी सभागृहात परिवर्तन चे जेष्ठ कार्यकर्ते शंभू पाटील, प्रा.अशोक पवार यांचेसह साने गुरुजी वाचनालय व ग्रंथालयाचे संचालक मंडळ, प्राध्यापक, प्राचार्य, साहित्यिक, युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.सुनील वाघमारे, गौतम सपकाळे, प्रा.कृष्णा संदानशिव, किरण बागुल, निखिल बैसाणे, अमोल संदानशिव, निलेश किर्तक, दिपक वाल्हे यांनी परिश्रम घेतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!