मागील तीन आठवड्यांहून अधिक काळ थांबलेली एसटी ची चाके पुन्हा धावण्याची आशा

मुंबई : आपल्या रास्त मागण्यांसाठी ऐन दिवाळीत सुरु झालेला एसटी कर्मचार्यांचा संप सुटून मागील तीन आठवड्यांहून अधिक काळ थांबलेली एसटी ची चाके पुन्हा धावण्याची काहीशी आशा निर्माण झाली आहे. राज्य सरकारकडून एसटी कर्मचार्यांना नोव्हेंबर महिन्यापासून पगारवाढ जाहीर केली आहे. राज्य सरकारने अंतरिम वेतनवाढीच्या प्रस्तावाला एस. टी. कर्मचारी शिष्टमंडळाने मंजूरी दिली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत झालेल्या निर्णयाची माहिती दिली. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती होती. सरकारकडून वेतनवाढीचा प्रस्ताव दिल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन उद्या दि.२५ नोव्हेंबर पासून कामावर हजर होण्याचे आवाहन अनिल परब यांनी केले आहे. वेतनवाढीच्या या निर्णयानुसार, १ ते १० वर्षाच्या कामगारांच्या पगारात ५ हजार, १ ते २० वर्ष नोकरी झालेल्यांसाठी ४ हजार, २० वर्षांपेक्षा जास्त नोकरी झालेल्यांसाठी अडीच हजार रुपयांची वाढ असेल. राज्य सरकार कर्मचाऱ्यांप्रमाणेच दरवाढ आणि भत्ता देणार. दरमहा वेतनाची हमी. अहवालानंतर विलीनीकरणावर निर्णय होणार. संप काळातील निलंबन तातडीने रद्द करणार.
सोमवार (दि.२२) रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अर्थमंत्री अजित पवार आणि अनिल परब यांच्यासोबत बैठक घेतली होती. या बैठकीत तातडीने विलीनीकरण करणे शक्य नसेल, तर कर्मचार्यांना २०२०-२४ या कालावधीसाठी भरघोस पगारवाढ देऊन तोडगा काढावा. तसेच समितीचा अहवाल आल्यानंतर विलीनीकरणाबाबत निर्णय घ्यावा, असा एक पर्याय पवार यांनी सुचविला होता. हा पर्याय समोर ठेवूनच बैठकीत चर्चा झाली होती. मंगळवारी सायंकाळी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीतील चर्चेचा तपशीलाबाबत माहिती देताना परिवहन मंत्री परब म्हणाले होते की, संपावरील कामगार जरी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असले, तरी त्याबाबत हायकोर्टाने एक समिती नेमली आहे. ही वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडली. या समितीचे काम सुरू आहे. ही समिती आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करील आणि मुख्यमंत्र्यांकडून तो हायकोर्टाला सादर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.