जि.प.पिंगळवाडे व कलाली शाळेतील दोन शिक्षकांचा शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल सन्मान

अमळनेेर तालुक्यातील शिक्षक दत्तात्रय सोनवणे व चंद्रकांत देसले यांचा सन्मानार्थींमध्ये समावेश

अमळनेर : जि.प.जळगाव व वॉवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन (वोपा) यांच्या एकत्रित पुढाकारातून सुरु झालेल्या ‘व्ही-स्कूल फ्री’ या ऍपमार्फत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य निर्माण करुन राज्याच्या शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या जिल्हाभरातील मराठी, सेमी इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांना नुकतेच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे जिल्हा मुख्य प्रशासन, जि.प.जळगाव व वोपा परिवार,पुणे यांचे संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अमळनेेर तालुक्यातील जि.प.पिंगळवाडे शाळेचे शिक्षक दत्तात्रय सोनवणे व जि.प.कलाली शाळेचे शिक्षक चंद्रकांत देसले यांचा सन्मानार्थींमध्ये समावेश आहे. कार्यक्रमास जि.प.जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण व वोपा संस्थेचे संस्थापक प्रफुल्ल शशिकांत यांची प्रमुख उपस्थिती होती.

मागील दीड वर्षापासून कोविडमुळे शाळा पुर्णपणे बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि शिक्षणाची गोडी वाढावी म्हणून मराठीसह आपल्या बोलीभाषा (अहिराणी) तून अभ्यासक्रमातील विविध घटक दर्जेदार व रंजक पध्दतीने तयार करण्यासाठी दोन्ही शिक्षकांनी जिल्हास्तरीय कार्यशाळेत सक्रिय सहभाग नोंदविला. शिक्षणविस्तार अधिकारी पी.डी.धनगर यांच्या नेतृत्वाखाली तालुकास्तरावर कार्यशाळा घेऊन अमळनेर तालुक्यासाठी दिलेले उद्दिष्ट अर्चना बागुल (सारबेटे), जयश्री पवार (जळोद), जिजाबराव पाटील (गंगापुरी), मनिषा पाटील (मठगव्हाण), छाया इसे (मठगव्हाण), मनिषा पाटील (सडावण), अशोक पाटील (शिरुड), मच्छिंद्र पाटील (खापरखेडा), कल्पना साळुंखे (ढेकुसिम), कविता पाटील (जैतपिर), अनिल धनुरे (शहापूर) व संदीप सूर्यवंशी या उपक्रमशिल व तंत्रस्नेही शिक्षकांसह शाळेतील विद्यार्थी, सहकारी मित्र व परिवारातील सदस्य यांचे मदतीने व्हिडीओ, पीपीट़ी, ऑडीओ, चित्रे, GIF इमेजेस, गुगल फार्म, वर्कशीट इ.विविध तंत्रांचा सुयोग्य वापर करुन आकर्षक व पाठ्यपुस्तकापलीकडे जाऊन अधिक माहिती देणारे पाठ तयार केले आहेत.

यापुर्वीही दत्तात्रय सोनवणे व चंद्रकांत देसले या दोन्ही शिक्षकांनी जिल्हास्तर गणित संबोध कार्यशाळेतून जिल्ह्यातील सुमारे २ हजार प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देऊन सुलभक म्हणून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला होता. त्यांच्या या यशाबद्दल अमळनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आर.डी.महाजन, शिक्षणविस्तार अधिकारी पी.डी.धनगर, केंद्रप्रमुख चंद्रकांत साळुंके, शरद सोनवणे, अशोक सोनवणे, रविंद्र पाटील यांनी त्यांचे कौतुक केले आहे. तसेच अमळनेर तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व शिक्षणप्रेमी यांचेकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे अभिनंदन..!

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!