ड्रीम फाऊंडेशन व ड्रीम IAS सेंटर पुणे यांचा उपक्रम

अमळनेेर : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जि.प.उच्च प्राथ.शाळा पिंगळवाडे ता.अमळनेर येथे ड्रीम फाऊंडेन व ड्रीम IAS सेंटर पुणे आयोजित १० तास अखंड वाचन-अभ्यास अभिवादन उपक्रम सकाळी ७ ते सायं. ५ वेळेत नुकताच दि.६ रोजी राबविण्यात आला. सदर उपक्रमाबाबत शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन इयत्ता ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभागी होण्यासाठी कोविड नियमांचे पालन करत पालकांची संमती घेऊन अखंड १० तास घरी किंवा शाळेत राहून सहभाग घेता येईल याबाबत सांगितले असता सर्व विद्यार्थ्यांनी शाळेतच येण्यास पसंती दर्शवली.पालकांनीही आपल्या पाल्यांना सदर उपक्रमात सहभागी होण्यास परवानगी दिल्याने एकूण ३३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सदर उपक्रमासाठी मिल के चलो असोसिएशन अमळनेर यांच्या पुढाकाराने समकालिन प्रकाशन पुणे यांचे तर्फे शाळेला मिळालेला पुस्तकसंच व शाळेतील पूज्य सानेगुरुजी विद्यार्थी-शिक्षक ग्रंथालयातील अवांतर वाचनाची प्रेरक, ज्ञानवर्धक व संस्कारक्षम पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली होती.

दीड वर्षापासून कोविडमुळे ऑनलाईन शिक्षणाच्या नावाने मोबाईल, टि.व्ही.सारख्या गॅझेटमध्ये रमणाऱ्या मुलांची पुस्तकांशी गट्टी जमली होती. त्यांचेसाठी चॉकलेट-बिस्कीटे आणून ठेवली होती. जमिनीवर बसून अवखळायला वाटेल म्हणून शाळेतील मोकळ्या व हवेशीर जागी बेंचेसची व्यवस्था करण्यात आली होती. सहभागी मुलांपैकी दिवसभरात पृष्ठ संख्येनुसार व वाचन गतीनुसार काहींनी तिन पुस्तके, काहींनी दोन पुस्तके, काहींनी फक्त एक पुस्तक वाचले तर काहींनी अर्धेच पुस्तक वाचले. त्यातही बऱ्याच मुलांनी मनापासून वाचन केले. काहींनी हौसेने सहभाग नोंदवला खरा पण पुर्णवेळ मन लावून वाचणे कठीण जात होते. तरी मधून मधून उपक्रम संयोजक तथा मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे यांनी मुलांकडून सुक्ष्म व्यायाम करुन घेत रंजकता आणली. शाळेतील शिक्षकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगून मुलांना प्रेरीत केले. त्यामुळे मुलांचा उत्साह टिकून होता. दिवसभरात काही पालकांनी ही हजेरी लावली. दिवसभरात उपक्रमात सहभागी मुलांच्या निरीक्षणातून मुलांमधील एकाग्रता, चंचलपणा, सहकार्य वृत्ती, खोडकरपणा, प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी इ. गुणांचा अनुभव आला.
समारोपीय शेअरींग व उपक्रमाबद्दलच्या अनुभवलेखनातून उपक्रमामुळे मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होवून रोज रोजच्या डेलिरुटींग ऐवजी पाठ्यक्रमाव्यतिरिक्त नविन गोष्टी वाचायला व अनुभवायला मिळाल्याचे कळले. काहींनी आजपर्यंत एका बैठकीत पुस्तक वाचून पुर्ण केले नसल्याचे बोलून दाखवले. काहींनी दरवर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी वाचन अभिवादन उपक्रम व्रत घेण्याबाबत सांगितले. तर काहींनी दररोज ३ ते ५ तास व दर रविवारी एकत्र येऊन असेच १० तास अखंड वाचन करण्याचा संकल्प बोलून कलेक्टर होण्याचे मोठे स्वप्न उराशी बाळगले. विद्यार्थ्यांच्या उपक्रमातील अनुभवामुळे ड्रीम फाऊंडेशन व ड्रीम IAS सेंटर पुणे यांनी आयोजित सदर उपक्रमाचा उद्देश कुठेतरी सफल होण्याच्या आशा पल्लवीत होतांना दिसल्या.
वाचन अभिवादन उपक्रमाचे आयोजन पुणे येथील ड्रीम फाऊंडेशनचे संचालक काशिनाथ भतगुणकी सर व सौ.सुषमा भोसेकर यांनी केले. तसेच अमळनेर येथील मिल के चलो असोसिएशन चे संचालक अनिरुध्द पाटील व विनायक पाटील यांनी विशेष योगदान दिले. उपक्रम यशस्वितेसाठी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे, पदवीधर शिक्षक प्रविण पाटील, उपशिक्षक रविंद्र पाटील, श्रीमती वंदना सोनवणे, शाळेचे स्वयंसेवक विक्रम शेलार, पालक व विद्यार्थी यांचे विशेष सहकार्य लाभले. उपक्रमात सहभागी विद्यार्थी, उपक्रम राबवणारे शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचे अमळनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आर.डी.महाजन, शिक्षणविस्तार अधिकारी पी.डी.धनगर व केंद्रप्रमुख चंद्रकांत साळुंके यांनी कौतुक केले आहे. अमळनेर तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व शिक्षणप्रेमी यांचेकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.