अमळनेर येथे आई जिजाऊ जन्मोत्सव उत्साहात साजरा
अमळनेर : छत्रपती शिवरायांचे कार्य आई जिजाऊंच्या सावलीत आणि त्यांच्या खांद्यावर उभे राहून आकारास आले हे लक्षात घेतले की, आई जिजाऊंच्या कार्याची उंची कळते असे मत शिव व्याख्याते प्रा.लिलाधर पाटील यांनी व्यक्त केले. येथील राजमुद्रा फाउंडेशन व मराठा सेवा संघ यांनी तहसील कचेरीच्या प्रवेशद्वारावर व ढेेेकू रोडवरील फोर्ट येथे आई जिजाऊ जन्मोत्सव नुकताच साजरा केला. त्यावेळी आई जिजाऊंच्या कार्य कर्तृत्वावर त्यांनी आपले विचार मांडले. प्रथम तहसील कचेरीच्या समोरील जिजाऊ प्रवेशद्वारावर व त्यानंतर ढेेेकू रोडवरील राजमुद्रा फाउंडेशन येथे आई जिजाऊ प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून जिजाऊ वंदना करण्यात आली.
प्रा. पाटील म्हणाले की, नि:सत्व आणि मुर्दाड बनलेल्या समाजावर स्वराज्य विचारांचे सिंचन करून त्याला स्वातंत्र्येच्छुक बनविणाऱ्या अशा आई जिजाऊ साहेब. इतिहासाच्या काल पटलावर एकमेवाद्वितीय ! फक्त मराठी जनमाणसातच नव्हे तर विश्ववंदनीय स्वरूपात त्यांच्या कार्याची महती पिढ्यानपिढ्या गायिली जाणार आहे. दृढ स्वराज्य विचार संकल्पक, कर्तव्यदक्ष प्रशासक, थोर मुत्सद्दी, धुरंदर राजकारणी, कार्य कर्तृत्व आणि मानवतावाद या त्यांच्या उठून दिसणाऱ्या व्यक्तिमत्वाचे स्वाभिमान आणि करारी बाणा हे रुपेरी पदर आहेत. छत्रपती शिवरायांचे कार्य आई जिजाऊंच्या सावलीत आणि त्यांच्या खांद्यावर उभे राहून आकारास आले हे लक्षात घेतले की, आई जिजाऊंच्या कार्याची उंची कळते.
यावेळी राजमुद्रा फाउंडेशन चे अध्यक्ष श्याम पाटील, श्रीकांत चिखलोदकर, प्रा.लिलाधर पाटील, कैलास पाटील, रणजित शिंदे, बापूराव ठाकरे, आर. बी. पाटील, संदीप खैरनार, अनंत सूर्यवंशी, अशोक कापडणीस, साई गजानन मंडळाचे एस.एम.पाटील, जयेश काटे, विजय गाढे, अहिरराव सर, बी.एल.सैंदाणे, विलास पाटील, अशोक पाटील, चंद्रकांत पाटील, प्रेमराज पवार, निंबाजी पाटील, आत्माराम अहिरे आदी उपस्थित होते.