संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावूून पंचनामे करण्याच्या सूूूचना देणार : आमदार अनिल पाटील
अमळनेर : तालुक्यात कधी कोरडा दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ अशा अस्मानी सुलतानी संकटाने बळीराजा बेजार झाला आहे. परतीच्या पावसाने गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर खरीप पिकांचे नुकसान केले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आहे. शेतमजूरांना काम नाही. उभ्या पिकांना कणसांवर कोंब आले आहेत यात ज्वारी, बाजरी, मका फुटलेली कापूस बोंडे यासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्व पिके शेतात सडत आहेत. आमदार अनिल पाटील यांनी नुकसानग्रस्त भागात काही गावांत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या.
जळगाव जिल्हा हा सर्वात मोठा कापूस उत्पादक जिल्हा असून कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. अमळनेर तालुक्यात देखील ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. यात १०० टक्के कापूस सडून गेला आहे. यामुळे २० टक्के देखील उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती येईल असे नाही. यासाठी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या जातील. कृषी सहाय्यक, ग्रामसेवक आणि तलाठी यांना संयुक्त पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात येतील. गेल्या वेळी काही अधिकाऱ्यांनी घरी बसून पंचनामे केल्याने शेतकरी शासकीय मदतीला मुकले होते. यावेळी प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन स्थळ पंचनामे करण्याची सूचना केली जाईल. त्यामुळे गतकाळात झालेला अन्याय यावेळी होणार नाही यासाठी काळजी घेतली जाईल. अमळनेर तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ५८२.२० मि.मी. इतके असून ता.२९ ऑक्टोबर पर्यंत सरासरी ८००.४० मि.मी. पाऊस झाला आहे. आमदार पाटील यांनी नुकतीच तालुक्यातील शिरूड येथे शेतशिवारात पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला व ओला दुष्काळ शासनाने जाहीर करावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल असे सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावून पंचनामे करण्याच्या सूचना देणार असल्याचे पत्र आमदार अनिल भाईदास पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे. पाहणीवेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन पाटील, कार्याध्यक्ष प्रा सुरेश पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, शिरुड वि.को.सो.चे चेअरमन प्रा सुभाष पाटील, गुलाब पाटील, वसंत पाटील, भैय्या पाटील, पुंजू पाटील, भालेराव पाटील, इंदापिंप्रीचे पोलीस पाटील भगवान पाटील, गणेश बोरसे, दिलु सोनवणे, प्रल्हाद पाटील, भास्कर पाटील आदी उपस्थित होते.