तालुक्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील गुणवंत शिक्षकांचा केला सन्मान.

अमळनेर : महाशिवरात्रीच्या पावन मुहुर्तावर गायत्री शक्तिपीठाचा ४१ वा वर्धापन दिन सोहळा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात संपन्न झाला. यावेळी गायत्री यज्ञ-संस्कार, प्रज्ञागीते, गुणगौरव, चिंतनिका तथा प्रबोधन व महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वक्ते- सन्तचरण गुप्ता (ज्येष्ठ परिव्राजक, गायत्री परिवार भुसावळ), ॲड.जी.वाय.विंचुरकर (ज्येष्ठ विधीतज्ञ, अमळनेर), बेंद्रे साहेब (अध्यक्ष, गायत्री परिवार धुळे), शशिकांत पाटील (अध्यक्ष, गायत्री परिवार ट्रस्ट अमळनेर), छोटुलाल शिंपी (उपाध्यक्ष, गायत्री परिवार ट्रस्ट अमळनेर) आदी उपस्थित होते.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून अमळनेर तालुक्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. यात, दत्तात्रय सोनवणे (मुख्याध्यापक, जि.प.शाळा पिंगळवाडे), प्रविण पाटील (पदवीधर शिक्षक, जि.प.शाळा पिंगळवाडे) व मनिषा पाटील (उपशिक्षिका जि.प.शाळा सडावण) या तीन जिल्हा परिषद शिक्षकांचा ग्रंथभेट पुरस्कार देऊन यथोचित गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रा.सतिष सोनार, अनिल राणे, प्रा.अशोक पवार, भगवान पाटील (पिंगळवाडे), सुभाष देशमुख (पिंगळवाडे), विलास पाटील (उपशिक्षक जि.प.शाळा बिलखेडे), मंदीर परिसरातील वाचनालयाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे नवयुवक व गायत्री परिवारातील साधक स्त्री-पुरुष सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी संस्थेमार्फत शक्तिपीठाचा जीर्णोध्दार व मॉं भगवती अन्नदान योजनेची माहिती देण्यात येऊन सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.सतिष सोनार व अनिल राणे यांनी केले. हेमंत पवार यांनी आभार मानले.