अमळनेर : स्वतंत्र भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्या. प्रथम आदिवासी महिलेची निवड होणे म्हणजे खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा विजय आहे. या पार्श्वभूमीवर उद्या (ता.२६) दुपारी तीन ला येथील मराठा मंगल कार्यालयात “जल्लोष स्त्री-शक्तीचा” हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात तालुक्यातील अनुसूचित जाती जमातीतील महिला सरपंचांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात खान्देशातील महिला पुरुषांसह सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुपच्या अध्यक्षा ऍड ललिता पाटील यांनी आज (ता २३) झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी ग्रुपच्या सदस्या वसुंधरा लांडगे, बाजार समितीचे संचालक पराग पाटील आदी उपस्थित होते. फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुप चा नववा वर्धापनदिन तसेच अॅड.ललिता पाटील यांचा वाढदिवसही यावेळी साजरा करण्यात येणार आहे. यावेळी सर्वपक्षीय महिला पदाधिकारी, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील महिला पुरुष यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
यापूर्वी फिनिक्स ग्रुप तर्फे अनेक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आले असून यात मूक मोर्चा, विद्यार्थ्यांची दत्तक योजना, बालकामगार तसेच महिलांसाठी कार्य, रेड लाईट एरियातील महिलांसाठी कार्य करण्यात आले आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात संसदेत १३ टक्के महिला खासदार होत्या मात्र आज ही संख्या केवळ नऊ टक्के आहे. प्रशासनातही स्त्रियांची टक्केवारी कमी आहे अशा या प्रतिकूल परिस्थितीत आपल्या देशाच्या अमृत महोत्सव प्रसंगी आज पहिल्या आदिवासी व द्वितीय महिला राष्ट्रपती निवड होणे ही बाब महात्मा गांधीजींचे स्वप्न पूर्ण करणारी आहे. संविधानाचे खऱ्या अर्थाने फलित झाले आहे.