अमळनेर : येथे सोमवार (ता.२९) पासून दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सुरू होणार आहे. अमळनेर तालुक्यातील देवगाव-देवळी येथील श्री साई कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात हे प्रदर्शन होणार आहे. एनसीईआरटी (नवी दिल्ली) यांच्या निर्देशानुसार ‘तंत्रज्ञान आणि खेळणी’ या विषयावर विज्ञान प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यात सहावी ते आठवी एक गट तर नववी ते बारावी दुसरा गट राहणार आहे. त्यासाठी एकूण ६ विषय निर्धारित केलेले आहेत. यात पर्यावरणास अनुकूल सामग्री, आरोग्य आणि स्वच्छता, सॉफ्टवेअर आणि अँप्स, वाहतूक / परिवहन, पर्यावरण आणि हवामान बदल व गणितीय मॉडेलींग या उपविषयांपैकी कोणत्याही एका उपविषयावर आधारित वैज्ञानिक प्रकल्प विद्यार्थ्यांनी तयार करणे गरजेचे आहे. तसेच या विज्ञान प्रदर्शनात विज्ञान शिक्षक ,प्रयोगशाळा सहायक परीचार यांनीसुद्धा आपल्या साहित्याची मांडणी करावी. यात १०० टक्के सहभाग नोंदवावा असे आवाहन गटशिक्षणाधिकारी शर्मिला चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी पी.डी. धनगर, शिक्षण विस्तार अधिकारी कल्पना वाडीले यांनी केले आहे.
सोमवारी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे सोमवारी (ता.२९) सकाळी ११ वाजता आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार स्मिताताई वाघ, माजी आमदार डॉ. बी एस पाटील, माजी कुलगुरू प्रा.डॉ. शिवाजीराव पाटील, श्री साई ज्युनिअर कॉलेजचे अध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव रत्नमाला कुवर, खजिनदार संभाजी साळुंखे आदी प्रमुख पाहुणे राहतील. मंगळवारी (ता.३०) दुपारी तीनला बक्षीस वितरण होणार असून माजी आमदार शिरीष चौधरी अध्यक्षस्थानी राहतील. माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विकास पाटील, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, उच्च माध्यमिक विभागाच्या विस्ताराधिकारी दिपाली पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.