शंभर टक्के भरपाईसाठी रावेर येथे ठिय्या आंदोलन
रावेर : शेतीचे पंचनामे करतांना पिकांचे नव्हे तर धान्यांचे प्रारूप पंचनामे व्हावेत. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसान भरपाई मिळावी व खरीप हंगामाच्या मजुरीची कामे हातातून गेलेल्या शेतमजुरांचे सर्व्हेक्षण करून सर्व मजुरांना प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी आज गुरुवार, ता.३१ रोजी येथील तहसीलदार कार्यालयासमोर जनसंग्राम बहुजन लोकमंच सामाजिक संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येऊन तहसीलदार श्रीमती अभिलाषा देवगुणे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात पुढील मागण्यांचा समावेश आहे. यात… १) केळी पिकाच्या संरक्षण विम्यासाठी कंपन्यांनी टाळाटाळ चालवली असल्याने व गेल्या ३ वर्षात विमा कंपन्यांना सरासरी २८ हजार कोटी नफा झालेला असल्याने केळीवरील मर रोगाची भरपाई म्हणून केळी उत्पादक तसेच ज्वारी, कापूस, सोयाबीन, मका व इतर खरीप हंगाम अक्षरशः मातीत गेला म्हणून सरसकट १०० टक्के नुकसान भरपाई जाहीर करा. २) ओला दुष्काळ जाहीर करतांना यावर्षीची अपवादात्मक परिस्थिती म्हणून ओल्या दुष्काळाचे निकष शिथिल करावेत. ३) शेतकऱ्यांच्या शेतातील उभा हंगाम नेस्तानाबूत झाल्याने पिकांचे नव्हे तर धान्याचे पंचनामे करून सरासरी उताऱ्याप्रमाणे धान्यांच्या रकमेची १०० टक्के नुकसान भरपाई मिळावी. ४) शेतमजुरांचे कापणी, काढणी व चारा बांधणे वैगरे हंगामाची मजुरी हाताची गेली म्हणून शेतमजुरांचा गावनिहाय सर्व्हे करून मजुरांना सरसकट प्रोत्साहन म्हणून रोख रक्कम व धान्य स्वरूपात अनुदान देण्यात यावे.
जनसंग्राम संघटनेचे संस्थापक विवेक ठाकरे, सचिव सुधाकर भंगाळे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनात शंकर बोरोले, पितांबर भंगाळे, ललित कोळंबे, कैलास भंगाळे, गौरव ठाकरे, आत्माराम भंगाळे, अनिल बोंडे, सतिष धांडे, प्रदीप ब-हाटे, सुखदेव पाटील, निवृत्ती पाटील, जगनाथ बोरोले, छगन नेहते, सुरेश भोगे, रतनलाल पाटील, कमलाकर बोंडे, सुभाष तायडे, कैलास साळवे, मधुकर हरणकर, गणेश बोरनारे, विकास पाटील, नारायण श्रीधर पाटील, मिलिंद धांडे, नंदकिशोर पाटील, अनिस पटेल, सुनील सुतार, जावेद खाटीक, भगवान कोकाटे, शकिर खाटीक आदी शेतकरी-शेतमुजुर आंदोलनात सहभागी झाले होते.