अन्यथा.. व्यापक जनआंदोलन उभारण्याचा पाडळसरे धरण समितीचा ईशारा

अमळनेर : तालुक्यातील निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण हे वर्षानुवर्ष रखडलेले असल्याने आणि संबंधित गावांचे पुनर्वसन प्रश्न ही मार्गी लागत नसल्याने सात्री गावच्या आणखी एका महिलेचा बळी गेला. शासनाच्या अनास्थेमुळे धरण व संबंधित गावांचे लोकांचे वित्त -जीविताचे प्रश्न निर्माण झाले आहे. शासनाने तातडीने धरण व पुनर्वसनासाठी गतीमानतेने निधी द्यावा, संबंधित नुकसानग्रस्त कुटूंबाला मदत द्या अन्यथा व्यापक जनआंदोलन उभारणार असा इशारा पाडळसरे धरण समितीने तहसीलदार मिलिंद वाघ यांची भेट घेऊन संतप्त भावना व्यक्त करीत निवेदन दिले. जिल्हाधिकारी यांनाही इ-मेलने निवेदन देण्यात आले आहे.
वर्षानुवर्षे निधीअभावी रखडलेल्या पाडळसरे धरणाची किंमत ५ हजार कोटी रुपयांच्या वर झालेली असून एकीकडे धरणाचे काम पूर्ण होत नाही आणि दुसरीकडे धरणाशी संबंधित व परिसरातील गावांचे पुनर्वसनही गतिमानतेने होत नाही. त्यामुळे संबंधित गावकऱ्यांना वित्त व जीवित हानीला सामोरे जावे लागत आहे. नुकतेच सात्री गावची एक महिला यामुळेच उपचाराअभवी दगावली आहे. गेल्या वर्षी एक मुलगी अशीच मृत्युमुखी पडली होती. यामुळे जनतेत मोठा रोष निर्माण झाला आहे अश्या संतप्त भावना तहसिलदार मिलिंद वाघ यांच्या दालनात पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, निंभोरा चे सरपंच समितीचे सदस्य सुनिल पाटील, देविदास देसले, महेश पाटील यांनी व्यक्त केल्यात. याप्रसंगी तहसीलदार यांनी सात्री गावचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे तातडीची बैठक होणार आहे. त्यात समितीच्या मागणीचा विषय घेऊ असे आश्वासन दिले. यावेळी राजेंद्र देसले, प्रसाद चौधरी यांचेसह तहसील कार्यालय येथे समितीचे अजयसिंग पाटील, रविंद्र पाटील, सौ.वसुंधरा लांडगे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.