जळगाव : राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झालेली असून राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी केला आहे. परतीच्या पावसासाठी राज्यात पोषक वातावरण तयार झाले असून हवामान खात्याकडून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पुणे वगळता अन्य जिल्हे तसेच जळगाव जिल्ह्याला ८ ऑक्टोबर पर्यंत तीन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातून पाच ते दहा ऑक्टोबर दरम्यान मान्सून माघारी फिरणार आहे. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी राज्यातील अनेक भागात पावसाच्या सरी बरसल्या. जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. काही दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आता पुन्हा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने कापूस, ज्वारी, मकासह अनेक पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.