शिस्तीतूनच घडतो विद्यार्थी; प्रा.म.सी.हळपे यांच्या शिस्तीने विद्यार्थी घडवित शाळेला दिला आकार : डॉ.मकरंद नारखेडे

अमृतमहोत्सवी सोहळ्यात जुन्या आठवणींना मिळाला उजाळा ; मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे विमोचन

भुसावळ : येथील सहकार नगर मधील कलश पॅलेस मध्ये काल दिनांक ११ ऑक्टोबर रोजी के.नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चे माजी मुख्याध्यापक प्रा.डॉ.म.सी.हळपे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सवी सोहळा पार पडला. यावेळी ‘शिस्तीतूनच विद्यार्थी घडत असतो; प्रा.डॉ.म.सी.हळपे यांच्या शिस्तीने विद्यार्थी घडवित शाळेला आकार दिला’ असे मत डॉ.मकरंद नारखेडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

योगायोग म्हणजे व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी तथा श्री शिवाजी विद्या प्रसारक मंडळ, भुसावळचे अध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक प्राध्यापक व.पु.होले व अमळनेर येथील साप्ताहिक दिव्यचक्र चे संपादक संजय सूर्यवंशी, सत्कारमूर्ती प्रा.डॉ.म.सी.हळपे, सोबत सौ.अमृता मनिराम हळपे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर शाल, श्रीफळ, बुके देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सर्वप्रथम प्रा.हळपे यांचे हस्ते केक कापण्यात आला. सुवासिनींनी सत्कारमूर्ती यांचे औक्षण केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे यांचे शुभहस्ते प्रा.हळपे यांचा शाल, श्रीफळ, बुके देऊन सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते प्रा.डॉ.म.सी.हळपे यांचे जीवनावर प्रकाशझोत टाकणारी स्मरणिका यावेळी प्रकाशित करण्यात आली. स्मरणिकेचे मुखपृष्ठ क्रेझी क्रिएशन चे विरेंद्र पाटील यांनी केले आहे. यानंतर दरम्यानच्या काळात प्रा.हळपे यांचे कुटुंबावर प्रेम करणाऱ्यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. काही उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले. आपल्या भावना व्यक्त करत सर्वांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय भाषणात डॉ.मकरंद नारखेडे म्हणाले की, शिस्तीतूनच विद्यार्थी घडत असतो; प्रा.डॉ.म.सी.हळपे यांच्या शिस्तीने विद्यार्थी घडवित शाळेला आकार दिला. यापुढेही असेच मार्गदर्शन करावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रमुख अतिथी साहित्यिक प्रा.व.पु.होले यांनी प्रा.डॉ.म.सी.हळपे यांचा चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचा प्रवास उलगडला. प्रा.हळपे लिखित ‘लोकमाता अहिल्यादेवी’ या गाजलेल्या कादंबरीचे कविवर्य पद्मश्री ना.धो.महानोर यांचे हस्ते प्रकाशन, लायन्स, रोटरी, ज्येष्ठ नागरिक संघाचे सामाजिक कार्य सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. साप्ताहिक दिव्यचक्र चे संपादक संजय सूर्यवंशी म्हणाले की, प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात पण, समजून घेणारी व समजावून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागतं. सन २००२ पासून भुसावळ येथे नोकरीनिमित्त प्रा.हळपे सरांशी, के.नारखेडे विद्यालयाशी संपर्क आला. त्या आठवणींना त्यांनी वाट मोकळी करुन दिली. सरांनी वेळोवेळी केलेलं मार्गदर्शन गुरुस्थानी मानून आमची मैत्री गुरु शिष्यात झाली असे ते म्हणाले.

आपल्या मनोगतात प्रा.डॉ.म.सी.हळपे यांनी आपला जीवनपट उलगडला. ते म्हणाले की, विद्यार्थी हा महत्वाचा दुवा आहे. ‘Students are best judges’ असल्याचे सांगितले. कामाने देह झिजतो हे खरे पण.. कुजत नाही. आपण सर्व काही चांगले करतो मात्र, जर का एकही चूक झाली तर केलेलं सारं व्यर्थ ठरतं. काम करत असताना अनेकांनी कोपरखळ्या मारण्याचा प्रयत्न केला. त्याकडे लक्ष न देता प्रामाणिकपणे आपले काम केले. संस्थेच्या अध्यक्षांनी कामाचे मूल्यमापन करुन दोन जादा वेतनवाढी दिल्याचेही त्यांनी बोलून दाखविले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वल सराफ यांनी तर आभार पोपटराव पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते उमेश नेमाडे, अष्टभूजा ज्येष्ठ नागरिक संघाचे रघुनाथ सोनवणे, के.नारखेडे विद्यालयातील शिक्षक वृंद, नातेवाईक, पत्रकार आदी उपस्थित होते. माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी, मित्रपरिवार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आशुतोष अडावदकर, ज्योती कुलकर्णी, ललित नेमाडे, पोपटराव पाटील, बापू वारके आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रम संपल्यावर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!