अमळनेर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यरत असलेल्या हमालाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे वारसांना एक लाखाचा धनादेश सभापती प्रफुल्ल पवार, माजी सभापती उदय वाघ यांचे हस्ते सुपुर्द करण्यात आला. यावेळी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना गहिवरुन आले होते. कामगार वर्गातूनही समाधान व्यक्त करण्यात आले.
बाजार समितीत कार्यरत असलेल्या हमाल, मापाडी, गुमास्ता यांना दररोज केलेल्या कष्टाचा जो मोबदला मिळतो त्यावर त्यांचे कुटुंब अवलंबून असते. मिळणारा तुटपुंजा मोबदला पाहता घरखर्च भागवितांना अनेक अडचणी येतात. अशातच कुटुंबकर्ता व्यक्तीचे निधन झाल्यास संकटकाळी मदत करता यावी हा उद्देश लक्षात घेवून बाजार समितीचे माजी सभापती उदय वाघ यांनी त्यावेळी २६५ कामगारांचा ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीकडून विमा करुन घेतला होता. त्यानुसार नुकतेच निधन झालेले हमाल संतोष काळू पाटील यांच्या वारसास एक लाखाचा धनादेश सुपुर्द करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे संचालक भगवान कोळी, हिरालाल पाटील, प्रभाकर पाटील व कामगार वर्ग आदी उपस्थित होते. अशाप्रकारे विमा संरक्षण देणारी अमळनेर बाजार समिती महाराष्ट्रातील पहिलीच बाजार समिती आहे.