नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम व आधार फाऊंडेशनच्या माध्यमातून सोहळ्याचे आयोजन
अमळनेर : नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम व आधार फाऊंडेशनच्या माध्यमातून येथील शैक्षणिक, कृषी, सामाजिक व ग्रामीण अशा क्षेत्रात उत्तम कार्य करणारे शिक्षक, शेतकरी, पोलीस पाटील यांना पुरस्कार देऊन सपत्नीक सन्मानित करण्यात आले. सरस्वती विद्यामंदिर, अमळनेरच्या प्रांगणात ६१ शिक्षकांना डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार, २५ शेतकऱ्यांना आदर्श शेतकरी, कोरोना काळात राबणाऱ्या २१ पोलीस पाटील यांना आदर्श पोलीस पाटील पुरस्काराने लोकप्रतिनिधी व अधिकारी यांचे हस्ते सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. आधार फाऊंडेशन चे अध्यक्ष अशोक पाटील यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.पुष्पलता पाटील यांनीही सोहळ्यास भेट दिली.
‘समाजासाठी कार्य करणाऱ्या सेवाभावीवृत्तीच्या कृतिशील पुरस्कारार्थीचा गौरव इतरांपुढे आदर्श निर्माण करणारा ठरेल’ असे आ.डॉ.सुधिर तांबे यांनी दूरध्वनीद्वारे संबोधित केले. जि.प.सदस्या सौ.जयश्री अनिल पाटील यांनी ‘उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव इतरांना ही प्रेरणा देतो’ असे सांगत आ.अनिल पाटील यांच्यावतीने शुभेच्छा व्यक्त केल्यात. प्रमुख मार्गदर्शक प्रा.अशोक पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी दादाराव जाधव यांनी आदर्श शिक्षक, उत्कृष्ट पोलीस पाटील, आदर्श शेतकरी यांना आपल्या कार्यातून समाजापुढे भविष्यात नवनविन आदर्श निर्माण करण्यासाठी आवाहन केले. सत्कार मंचावर अमळनेर पं.स.च्या गटशिक्षणाधिकारी सौ.एस.पी.चव्हाण, खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष हरी भिका वाणी, सौ.योगिता पाटील, सौ.ताराबाई चव्हाण उपस्थित होते. यावेळी जळगांव जिल्हा संस्थाचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयवंत पाटील, जि.प.सदस्य डॉ.अशोक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संयोजक नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम चे नॅशनल डायरेक्टर गोरख देवरे, ऍडीशनल डायरेक्टर प्रमोद पाटील यांनी प्रास्ताविकात ‘समाजातील चांगले हेरून लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न फोरम करीत असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन सरस्वती विद्या मंदिर चे मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी केले. फोरमतर्फे तालुकाध्यक्ष प्रफुल्ल पाटील व आधार फाउंडेशन तर्फे मुख्याध्यापक आशिष पवार यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्या मंदिर, समता प्राथमिक विद्या मंदिर च्या शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, तसेच मानवाधिकार फोरम चे सौ.प्रिया पाटील व सहकारी यांनी परिश्रम घेतले.