साहित्याच्या कृतीत ज्याला स्वतःला विरघळून टाकता येते आणि त्यातून उगवता येते तोच खरा साहित्यिक : डॉ.म.सु.पगारे

दोन दिवसीय जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचा समारोप

अमळनेर : येथील पूज्य सानेगुरुजी साहित्य नगरीतील महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ पुरस्कृत मराठी वाड्मय मंडळ आयोजित दोन दिवसीय जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाच्या समोरोपीय दिवसाला आज दिवसभर परिसंवाद, कथाकथन, कविकट्टा या कार्यक्रमांना रसिक श्रोत्यांनी भरगच्च गर्दी करीत साहित्यनगरी फुलली होती.

“साहित्याच्या कृतीत ज्याला स्वतःला विरघळून टाकता येते आणि त्यातून उगवता येते तोच खरा साहित्यिक !”अशी व्याख्या समारोप समारंभाच्या अध्यक्षीय भाषणात विचारधारा प्रशाळेचे संचालक डॉ.म.सु.पगारे यांनी मांडली. साहित्य लेखकाच्या अनुभूतीतून आले पाहिजे. समस्त साहित्य व्यवहार व्यापणारा प्रचारकी साहित्याचा धुडघुस थांबवला पाहिजे असे आवाहन त्यांनी साहित्य चळवळीतील कार्यकर्त्यांना केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी मंचावर उपस्थित महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांनी साहित्याचे खरे समीक्षक समाजच असतो. साहित्य संमेलनाचे आयोजन ठिकठिकाणी होऊन त्यात विद्यार्थी तरुणांना सामावून घेतले पाहिजे असे आवाहन केले. यावेळी मंचावर म.वा.मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ.वसुंधरा लांडगे यांनी केले.

“सोशल मीडिया आणि त्याचा समाज जीवनावर होणारा परिणाम” या विषयावर संपन्न झालेल्या परिसंवादात प्रा.डॉ.ज्ञानेश्वर कांबळे यांनी ‘जाहिरातीचे मूलभूत तत्व खोटे बोलणे आहे अश्यावेळी समाज माध्यमातून व्यक्ती स्वतःची जाहिरात करू लागलेला असतांना समाज माध्यमांनीच परखड खोटे कसे बोलावे हे शिकवले ‘ असा घणाघात यावेळी केला. प्रा.डॉ.उषा पाटील यांनी ‘समाजमाध्यमानी माणसांचे जगणे संपन्न केले. माहितीचा स्रोत मिळवून दिला ‘ असे सांगितले. प्रा.डॉ.रमेश माने यांनी समाजमाध्यमांचा अतिरेकी वापर टाळून वाचन संस्कृती जोपासली पाहिजे असे समतोल मत मांडले. तर साहित्यिक वि.दा.पिंगळे यांनी समाज माध्यमांचा वापर चांगला केला तर माणसा-माणसामध्ये स्नेह वाढवता येतो असे मत मांडले. परिसंवादाच्या समारोपीय अध्यक्षीय भाषणात प्रा.डॉ.एल.ए.पाटील यांनी ‘समाज माध्यमाचा योग्य वापर करण्यात तरुणाई चुकत नसून जबाबदार नागरीक चुकत आहेत. अगोदर नागरिकांनी जबाबदारीने समाज माध्यमांचा वापर करावा ‘ असे आवाहन केले. परिसंवादाचे सूत्रसंचालन सारांश सोनार यांनी केले.

“कथाकथन” सत्रात कस्तुरी प्रकाशन संस्थेचे प्रकाशक व लेखक गोकुळ बागुल यांनी मी खरंच वेडा नाही ही कथा सादर करीत स्वातंत्र्य आंदोलनातील स्वातंत्र्य सैनिकांची व्यथा मांडत कथाकथानातून देशभक्ती व देशप्रेमाचा संदेश दिला. प्रा.सौ.योगिता पाटील यांनी मांडलेल्या कथेतून स्रियांनी स्रियांवर अत्याचार होतांना स्रियांची बाजूही कशी घ्यावी ही स्त्री अस्तित्वाची जाणीव करून देणारी अहिराणी भाषेतुन कथा सादर केली. आदिवासी साहित्यिक सुनिल गायकवाड यांनीही भिलाऊ भाषेत अंधश्रद्धेला बळी न पडता शिक्षणाची व बेरोजगारीची आजची दैना मांडण्याचा केलेला प्रयत्न प्रेक्षकांच्या टाळ्या घेऊन गेला. अध्यक्षीय भाषणात सुप्रसिद्ध साहित्यिक अॅड.विलास मोरे यांनी ‘टोंणग’ ही कथा सादर करून सहभागी कथाकारांच्या कथांचा वेध घेतला. सूत्रसंचालन प्रा.डॉ.पी.बी.भराटे यांनी केले. मंचावर म.वा.मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी उपस्थित होते.


सकाळच्या सत्रात बालकवी ठोंबरे कवी कट्ट्याचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, मुंबई चे कार्याध्यक्ष मा. प्रा.डॉ. नरेंद्र पाठक यांच्या हस्ते झाले. यावेळी संमेलनाध्यक्ष मा. प्रा. मिलिंद जोशी, सुप्रसिद्ध साहित्यिक मा. प्रभाकर साळेगावकर, कविवर्य मा. वि. दा. पिंगळे पुणे, म वा मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, मराठी साहित्य परिषद अमळनेरचे कार्याध्यक्ष कवी रमेश पवार, कविकट्टा समिती प्रमुख डॉ. कुणाल पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. उद्घाटनपर भाषणात प्रा डॉ नरेंद्र पाठक म्हटले की कविता केली जात नाही तर कविता होते. कविकट्टा हे प्रत्येक साहित्य संमेलनाचे मुख्य आकर्षण ठरते. यावेळी प्रा. मिलिंद जोशी, प्रभाकर साळेगांवकर, वि दा पिंगळे, डॉ. कुणाल पवार यांनी दर्जेदार कविता सादर करून संमेलनाची सुरवात केली. यावेळी ६० कवींनी कवी कट्ट्याला सहभाग नोंदविला. निवेदक शरद पाटील होते. कवी कट्टा यशस्वी होण्यासाठी कविकट्टा संयोजन समितीतील रामकृष्ण बाविस्कर, उमेश काटे, दत्तात्रय सोनावणे, मनोहर नेरकर, डी ए धनगर, श्रीमती पूनम साळुंखे, श्रीमती क्रांती साळुंखे यांनी मेहनत घेतली. पुर्वरात्री संपन्न झालेल्या कवी संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ कवी शशिकांत हिंगोणेकर यांनी कविते शिवाय जीवन असू शकत नाही असे सांगत कवितेचे पैलू समाजशास्त्रीय दृष्ट्या मांडले. कविसंमेलनात कवी विलास पाटील, विरेंद्र बेडसे, कवी रमेश धनगर, प्रा.भरतसिंग पाटील, डॉ.दिनेश पाटील आदिंनी सहभाग घेतला. जेष्ठ कवी रमेश पवार यांनीही लोकाग्रहास्तव बाप एक वेदनाशास्र ही कविता सादर केली. सूत्रसंचालन सारांश सोनार यांनी केले.

साहित्य संमेलनाचे शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी दोन दिवस उपस्थित राहून कार्यक्रम, साहित्यिक यांच्या मुलाखती उदघाटन ते समारोप समारंभ अहवाल लेखन,छायाचित्रण केले. त्यातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट लेखन पुरस्कार विजेता, साने गुरुजी कन्या हायस्कूल, उत्कृष्ट लेखन पुरस्कार उपविजेता श्री एन.टी.मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण पुरस्कार विजेता संघ साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय, उत्कृष्ट छायाचित्रण पुरस्कार उपविजेता संघ, डी.आर.कन्या शाळा- अमळनेर, लेखन प्रेरणा उत्तेजनार्थ पुरस्कार विजयनाना पाटील आर्मी स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज, अमळनेर यांना देण्यात आला. साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी डॉ अविनाश जोशी, संयोजन समिती चे प्रमुख रमेश पवार, नरेंद्र निकुंभ, संदीप घोरपडे, सौ.वसुंधरा लांडगे, सुरेश माहेश्वरी, सौ.शिला पाटील, सौ.रजनीताई केले, सोमनाथ ब्रह्मे, प्रदिप साळवी, श्याम पवार, भैय्यासाहेब मगर, शरद सोनवणे, दिनेश नाईक, बन्सीलाल भागवत, श्रीमती स्नेहा एकतारे, रणजित शिंदे, प्रा.लिलाधर पाटील, हेमंत बाळापुरे, जगदिश कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. खान्देश शिक्षण मंडळाचे व पत्रकार संघाचे अध्यक्ष व पत्रकार यांचेसह मराठी साहित्य परिषदेचे सहकार्य लाभले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!