श्री मंगळग्रह मंदिर प्रशासनाचा कार्पोरेट लूक; भाविकांची होते सोय

अमळनेर : कार्पोरेेट क्षेत्रात विशिष्ट गणवेश हा संस्था आणि प्रशासनाची ओळख करून देतो. गणवेशाला एकत्रित समूह भावना व शिस्तीचे प्रतीकही मानले जाते. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह विविध संस्था, संघटना, महामंडळे, शासकीय कार्यालये, सैनिक, पोलीस, अग्निशमन दल, टपाल खाते. महापालिका कर्मचारी, परिचारिका, हवाई सुंदरी, उद्योग समूह आदींमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या गणवेशातून आजवर त्याचे महत्त्व दिसून आलेले आहे. गेल्या काही वर्षांपासून देशभरातील विविध धार्मिक स्थळी अर्थात मंदिरांमध्येही पुरोहित तसेच तेथील सेवेकरी, प्रशासकीय कामकाज सांभाळणारी मंडळी विशिष्ट रंगसंगतीतील गणवेशात दिसू लागली आहेत. त्यात अमळनेर (जळगाव, महाराष्ट्र) येथील मंगळग्रह सेवा संस्थेंतर्गत श्री मंगळग्रह मंदिराचाही समावेश असून, श्री मंगळग्रह मंदिर आता कॉर्पोरेट जगताकडे झेपावले आहे. किंबहुना ‘गणवेश घाला, शिस्त लावा’ ही उक्ती या ठिकाणी प्रत्यक्ष रुजल्याचे चित्र भाविकांना दिसू लागले आहे.

मंगळग्रह मंदिरातील विविध विभागांमध्ये कार्यरत सेवेकरी गेल्या काही वर्षांपासून मंगळवार व्यतिरिक्त इतर दिवशी विशिष्ट रंगसंगतीतील गणवेशात दिसतात, तर मंगळवारी लाल रंगाचा कुडता व पांढऱ्या रंगाची सलवार परिधान केलेल्या स्वरूपात दिसतात. मात्र, प्रशासकीय कामकाज सांभाळणाऱ्या सेवेकऱ्यांचीही भाविकांना सहजपणे ओळख व्हावी, या उद्देशातून अतिशय आकर्षक पद्धतीचा गणवेश आता हे सेवेकरी परिधान केलेले दिसू लागले आहेत. त्यामुळे भाविकांमध्ये आता या गणवेशधारी सेवेकऱ्यांप्रती अतिशय मंगल भावना निर्माण होऊ लागली आहे. गणवेशामुळे मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाची कोणत्या सेवेक-याकडून आपणास कोणती नेमकी माहिती मिळू शकेल, याचीही जणू सोय झाल्याचे दिसू लागले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!