
अमळनेर : जळगाव जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात बुलढाणा अर्बन बँकेचे जाळे आहे. आजतागायत बॅंकेने आपल्या सभासदांना अधिक सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचाच भाग म्हणून पारोळा तालुक्यातील म्हसवे शिवारात शेतकऱ्यांचा व व्यापाऱ्यांचा शेतमाल ठेवण्यासाठी बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बुलढाणा या संस्थेच्या स्वमालकीचे वेअर हाऊस बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या वेअर हाऊस बांधकाम पूर्ण झाल्याने मान्यवरांच्या हस्ते उद्या लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक रमेश पवार व पारोळा शाखेचे व्यवस्थापक कैलास कुंभेकर, अमळनेर शाखेचे व्यवस्थापक विनोद नेरपगार यांनी दिली.
या वेअर हाऊसचा लोकार्पण सोहळा उद्या रविवार दिनांक २२ जानेवारी रोजी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सुकेशजी ब्रिजमोहन झंवर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. पारोळा तालुक्याचे आमदार चिमणराव पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी मा. पालकमंत्री डॉ.सतीश पाटील, मा.खा. ए.टी.नाना पाटील, मा.खा.वसंतराव मोरे, लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने, म्हसवे गावचे लोकनियुक्त सरपंच सौ.ज्योती संदानशिव आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.