अमळनेर येथील बहादरपुर रस्त्यालगत असलेल्या शाळेला आपल्या आईचे नाव देत मातृ ऋण फेडण्याचा प्रयत्न

श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अशोक पाटील यांचा आदर्श

अमळनेर : ‘शाळेला आईचे नाव देऊन मातेचे ऋण फेडणाऱ्या सुपुत्राने एक आदर्श निर्माण केला आहे’ असे प्रतिपादन आ.अनिल पाटील यांनी सौ.विमलबाई आधार पाटील शाळेच्या नामकरण समारंभात केले. श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी अमळनेर येथील बहादरपुर रस्त्यालगत असलेल्या शाळेला आपल्या आईचे नाव देत नामकरण समारंभ आयोजिलेला होता. याप्रसंगी मंचावर प्रा.अशोक पवार, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ.तिलोत्तमा पाटील, गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील, संचालक किसन पाटील, अरुण भावसार, विजय जैन, सचिव सौ.योगिता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

आ.अनिल पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत नामकरण श्री.आधार सुकदेव पाटील व सौ.विमलबाई आधार पाटील यांचे हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. सरस्वती विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्य सादर केले तर सौ.विमलबाई पाटील शाळेचे विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. सालदारकी करुन समाजभान असलेले सुसंस्कारित, उच्च शिक्षित करुन संस्थाचालक झालेले आदर्श मुलं घडविणारे सौ.विमलबाई व श्री आधार पाटील यांचा आमदार अनिल पाटील यांनी स्वतः विशेष सत्कार केला.

आ.अनिल पाटील पुढे म्हणाले की, अशोक पाटील यांनी काही काळातच अनेक आदर्श अशा शैक्षणिक संस्थांचे काम उभारून परिसराचा कायापालट करण्यास व तालुक्यातील संस्था सांभाळण्यास समर्थ असल्याचे सिद्ध केले आहे. यावेळी प्रमुख वक्ते प्रा.अशोक पवार यांनी म्हणाले की, गोरगरीब कष्टकरी मुलांना आधुनिक सोयी सुविधांसह मोफत शिक्षण देण्याचे उत्कृष्ट कार्य सौ विमलबाई आधार पाटील प्राथमिक विद्या मंदिर च्या माध्यमातून सुरू आहे.

‘स्वतः जे कष्ट भोगले ते माझ्या परिसरातील जनतेच्या विद्यार्थ्यांच्या वाट्याला येऊ नये म्हणून सेवाभावीवृत्तीने काम करतोय’ असे अध्यक्ष अशोक पाटील यांनी प्रास्ताविकातून सांगितले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी केले. पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत व सर्व पत्रकार बंधू यांचेसह उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव, शालेय पोषण अधिक्षक भुपेंद्र बाविस्कर, माळी समाज अध्यक्ष मनोहर महाजन, राज्य ग्रंथालय समिती सदस्या सौ.रिता बाविस्कर, मा.उपनगराध्यक्ष पांडुरंग महाजन यांचेसह अमळनेर तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक ग्रा.पं.सरपंच व सदस्य यांचेसह विद्यार्थी, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे कार्याध्यक्ष समाधान शेलार, मुख्याध्यापक आशिष पवार, उपाध्यक्ष भिमराव पाटील, संचालक दिलीप पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!