माथाडी कामगार, हमाल मापाडी संघटना, अमळनेर तालुका सीड्स पेस्टिसाइड्स फर्टीलायझर्स असोसिएशन, तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायट्या यांचा सहभाग

अमळनेर : तालुक्यातील पाडळसे धरण गतिमानतेने पूर्ण व्हावे व धरणाचा समावेश पंतप्रधान कृषी संजीवनी योजनेत व्हावा यासाठी सुरू असलेल्या ५१ हजार पत्र लेखन आंदोलनात माथाडी कामगार हमाल मापाडी संघटना व अमळनेर तालुका सीड्स पेस्टिसाइड्स फर्टीलायझर्स असोसिएशन, तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सचिवांनीही मासिक सभेत पत्र लिहून आंदोलनात सहभाग नोंदविला आहे. त्यांनी सहभाग घेत ९ फेब्रुवारी च्या आंदोलनात सहभागी होण्याचे जाहीर केले आहे. अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नुकतीच येथील हमाल मापाडी संघटनेची बैठक संपन्न झाली. हमाल मापाडी संघटनेच्या वतीने रमेश धनगर यांनी ‘जल है तो कल है’ घोषणा देत पाडळसे धरण पूर्ण व्हावे म्हणून जन आंदोलन समितीला संघटनेचा पाठिंबा जाहीर केला. यावेळी जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी यांनी धरण पूर्तीसाठी सर्वसामान्य लोकांनी सहभागी व्हावे म्हणून पत्र आंदोलन सुरू केल्याचे सांगितले. समितीचे रणजित शिंदे यांनी पाडळसे धरणाची किंमत अपूर्ण निधी अभावी हजार कोटींने वाढत असल्याने वेळीच जनतेचा दबाव निर्माण होणे गरजेचे आहे असे सांगितले. यावेळी समितीचे रामराव पवार, सुशिल भोईटे आदि उपस्थित होते.

अमळनेर तालुका सीड्स पेस्टिसाइड्स फर्टीलायझर्स असोसिएशनची बैठक डुबकी मारोती मंदिर येथे संपन्न झाली. बैठकीत उपस्थित सभासदांनी मा.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे नावे पत्र लिहीत आंदोलनात सहभाग नोंदवला असून संघटना ९ फेब्रुवारीला समितीच्या सोबत असल्याचे सांगितले. यावेळी मुन्नाशेठ पारेख, विजय जैन यांचे सह जनआंदोलन समितीचे प्रशांत भदाणे, योगेश पवार, ललित ब्रम्हेचा आदींनी मार्गदर्शन केले. जनआंदोलन समितीचे रविंद्र पाटील, रामराव पवार, सुशिल भोईटे आदींसह असोसिएशनचे मगन पाटील, दिपक पाटील, चेतन पाटील, सुनिल पाटील, किरण पाटील आदी उपस्थित होते.

अमळनेर तालुक्यातील जानवे येथील माजी सरपंच भटू पाटील यांचे सुपुत्र शुभम भटू पाटील व श्रीराम गंगाराम देवरे यांची कन्या चिसौका गायत्री यांनी हळदीच्या समारंभात वऱ्हाडी मंडळीसह वधु वर यांनी देखील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या नावे धरणासाठी पत्र लिहून आपले सामाजिक उत्तरदायित्व पार पाडले. शिवधर्म पद्धतीने पार पडलेल्या या हळदीच्या लग्न सोहळ्यात आर.बी.पाटील, सौ.वसुंधरा लांडगे यांनी विधिवत कार्य पार पाडतांना सामाजिक योगदान देण्याचा आदर्श वधू-वर यांनी त्यांच्या नातेवाईक मंडळींसह निर्माण केला आहे. याप्रसंगी ज्येष्ठ शेतकरी नेते प्रा.शिवाजीराव पाटील, विश्वास पाटील, मा.सभापती श्याम अहिरे, माजी सरपंच रावसाहेब पाटील, सौ.रुपाली पाटील, दिनेश पाटील यांचेसह आजी माजी ग्रा.पं.चे पदाधिकारी उपस्थित होते.

अमळनेर तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी च्या सचिवांनी देखिल बैठक घेवून शासनाच्या नावे शेकडो पत्र लिहून समितीच्या पदाधिकऱ्यांजवळ सुपूर्द केले. याप्रसंगी समितीचे सुभाष चौधरी, हेमंत भांडारकर यांनी मार्गदर्शन केले तर गटसचिव संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय शेखनाथ पाटील यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. भगवान पाटील, युवराज पाटील, रतिलाल पाटील, कैलास पाटील आदींसह मोठ्या संख्येने सचिव उपस्थित होते.