स्त्रियांच्या आत्मसन्मानासाठी लढा उभारण्याचे ज्येष्ठ समाजसेविका प्रतिभाताई शिंदे यांचे आवाहन

जुन्या परंपरेला छेद देत खौशी येथे विधवा व परित्यक्त्या महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रमात सन्मान

अमळनेर : हिंदू संस्कृतीमध्ये मकरसंक्रांतीच्या पर्वावर सौभाग्याचे लेणे लेऊन महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम साजरा केला जातो. ज्या महिला विवाहित आहेत त्याच महिला यामध्ये सहभागी होतात. खडतर परिस्थितीशी झुंज देत जीवनातील आव्हानांचा स्वीकार करून संकटांना सामोरे जात स्वआस्तित्व सिद्ध करत समाजाला आपल्या स्वाभिमानी वृत्तीची जाणीव करून देणाऱ्या विधवा व परित्यक्त्या यात सहभागी नसतात. याच वाईट परंपरा समाजामधून दूर व्हाव्यात, प्रत्येकाला अभिमानाने जगता यावे त्यांनाही सण साजरा करता यावा यासाठी खौशी येथे या विधवा व परित्यक्त्या महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रमात नुकताच सन्मान केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेविका प्रतिभाताई शिंदे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, भाजप प्रदेश उपाध्यक्षा अॅड. ललिता पाटील, अॅड. तिलोत्तमा पाटील, खा.शि. मंडळाच्या विश्वस्त वसुंधरा लांडगे, आधार संस्थेच्या संचालिका भारती पाटील उपस्थित होत्या.

माजी पंचायत समिती सदस्य अरुण देशमुख यांनी प्रास्ताविक करताना कार्यक्रमाबाबत भूमिका विशद केली. समाज क्रांतीकारी महानायिकांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. आपल्या अध्यक्षीय भाषणातून ज्येष्ठ समाजसेविका प्रतिभाताई शिंदे यांनी स्त्रियांच्या आत्मसन्मानासाठी लढा उभारण्याचे आवाहन केले. विधवांना विधवा न संबोधित करता एकल महिला संबोधण्यावर भर दिला पाहिजे असेही त्यांनी उपस्थितांना सांगितले.

या प्रेरणादायी उपक्रमाद्वारे जुन्या रितीरिवाजाला फाटा देत सामाजिक बदलाच्या दिशेने पाऊल टाकून एक नवा अध्याय सुरू केला. आजी माजी सैनिकांच्या माता पित्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी खवशी गावच्या सरपंच सौ.जयश्री अरुण देशमुख, माजी सरपंच तथा सदस्य सौ.गौरी कैलास पाटील, सौ.अनिता गणेश बाविस्कर, सौ.आशा अरुण गोसावी, सौ.मंदाबाई गुलाब पाटील, सौ.अवंताबाई धनराज पवार, सौ.आशाबाई अनिल शिरसाठ, ग्रामसेविका सौ.आर.व्ही.पवार व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन जि.प.शाळेच्या उपशिक्षिका पूनम पवार व प्रसाद कापडे यांनी केले तर बी.के.सूर्यवंशी यांनी आभार मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!