रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे निर्घृण हत्या प्रकरणी महाराष्ट्र पत्रकार संघाचे वतीने मुख्यमंत्र्यांना तहसीलदार यांचेमार्फत निवेदन

पत्रकार संरक्षण कायद्याची कडकपणे अंमलबजावणी करण्याची राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर यांची मागणी

अमळनेर : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली निर्घृण हत्या आणि गेल्या आठ दिवसात केज, मुखेड, धुळे आदी ठिकाणी पत्रकारांवर झालेले हल्ले किंवा खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटना यात खूपच वाढ झाली आहे. यासंदर्भात आज शुक्रवार, दिनांक १० फेब्रुवारी २०२३ रोजी संपुर्ण राज्यभर पत्रकार काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करीत आहेत. मा.मुख्यमंत्री साहेब यांनी पत्रकार बांधवांच्या संतप्त भावना लक्षात घ्याव्यात यासाठी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने अमळनेर येथे तहसीलदारांच्या वतीने नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, पुरोगामी राज्यात पत्रकारांवर वारंवार हल्ले होण्याच्या घटनेत वाढ होत आहे. तसेच पत्रकारांवर हल्ले करुन किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. महाराष्ट्रात निर्धोकपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे. या घटना सातत्याने वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भितीची भावना निर्माण होत आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधत आहोत. शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा निषेध करत आहोत. आपण सदर निवेदनाची गांभिर्याने दखल घ्यावी असेही निवेदनात म्हटले आहे. त्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची कडकपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे. निवेदनावर महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य कार्यकारणी सदस्य ईश्वर महाजन, मा.अमळनेर तालुकाध्यक्ष संजय सूर्यवंशी, पत्रकार महेंद्र रामोशे, यदुवीर पाटील, जितेंद्र बडगुजर, योगेश पाने, नूरखान पठाण, सुरेश कांबळे, सचिन चव्हाण, समाधान मैराळे, अजय भामरे, उमेश काटे, जयेशकुमार काटे आदी पत्रकारांच्या सह्या आहेत.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!