व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेतर्फे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध

उपविभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर यांना निवेदन देऊन संबंधितांवर कठोर कारवाई ची केली मागणी.

(दिव्यचक्र वृत्तसेवा)

अमळनेर : येथील व्हॉईस ऑफ मीडिया (Voice of Media) व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम संघटनेतर्फे प्रदेश सरचिटणीस डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध करत उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते साहेब व पोलीस निरीक्षक निकम साहेब यांना निवेदन देऊन संबंधितांवर कठोर कारवाई ची केली मागणी करण्यात आली.

व्हॉईस ऑफ मीडिया (Voice of Media) व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम ही प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल, वेब, रेडिओ, साप्ताहिक, मासिक, छायाचित्रकार, कॅमेरामन, युट्यूब, सोशल मीडिया आणि स्वतंत्र पत्रकारांना एकत्र आणणारी आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना आहे. भारतासह ७८ देशांमध्ये कार्यरत असलेली ही संघटना पत्रकारांचे हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकार कल्याण आणि लोकशाही मूल्यांच्या जतनासाठी सातत्याने कार्यरत आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता समाज, शासन आणि जनतेमध्ये संवादाचा सेतू म्हणून काम करते. सत्य घटनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे, सत्तेला प्रश्न विचारणे आणि लोकहिताचे प्रश्न मांडणे हे पत्रकारांचे घटनात्मक व नैतिक कर्तव्य आहे. त्यामुळे पत्रकारांचा सन्मान राखणे ही लोकशाहीची मूलभूत गरज आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात शिवसेना (शिंदे गट) चे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकाराबाबत केलेले अपमानास्पद वक्तव्य अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि लोकशाही मूल्यांना काळिमा फासणारे आहे. एखाद्या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी त्याच्याविषयी अवमानकारक भाषा वापरणे ही केवळ त्या पत्रकाराची नव्हे, तर संपूर्ण पत्रकारिता क्षेत्राची अवहेलना आहे.

लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारची भाषा वापरली गेल्यास समाजात पत्रकारांविषयी चुकीचा संदेश जातो. अशा विधानांमुळे पत्रकारांवर दबाव निर्माण होतो, त्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता वाढते आणि मुक्त व निर्भीड पत्रकारितेच्या वातावरणावर प्रतिकूल परिणाम होतो. लोकशाहीत टीका सहन करण्याची क्षमता आणि माध्यमांचा सन्मान राखणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे.

व्हॉईस ऑफ मीडिया – व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम च्या वतीने मागण्या खालीलप्रमाणे :

  • १. खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्याची शासनाने तातडीने गंभीर दखल घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा.
  • २. संबंधित खासदारांनी संपूर्ण पत्रकार बांधवांची जाहीर व लेखी बिनशर्त माफी मागावी. त्यांनी दिलगिरी नाही माफी मागावी.
  • ३. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या वर्तनाची चौकशी करून कायद्याच्या चौकटीत आवश्यक ती कठोर कारवाई करण्यात यावी.
  • ४. भविष्यात पत्रकारांचा अवमान करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध कठोर भूमिका घेण्याचे धोरण शासनाने जाहीर करावे.
  • ५. राज्यातील पत्रकारांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे यासाठी पत्रकार संरक्षणासंदर्भातील उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात.
  • ६. जो पर्यंत या खालील न्याय मिळत नाही तोपर्यंत संजय दिना पाटील आणि शिंदे गट यांच्या पत्रकार परिषदेवर आम्ही बहिष्कार टाकतो.
  • ७. राज्यात संजय दिना पाटील यांच्या सारखे पत्रकार, पत्रकारितावर आग पाखड करणाऱ्या प्रत्येका विषयीची चूक लक्षात येताच त्याच क्षणी गुन्हा दाखल करण्यात यावा.

या प्रकरणात शासनाने तातडीने योग्य कारवाई न केल्यास व्हॉईस ऑफ मीडिया – व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम राज्यातील प्रत्येक जिल्हा, प्रत्येक तालुका आणि प्रत्येक शहरात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारेल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी शासन व संबंधित लोकप्रतिनिधींवर राहील. असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

पत्रकारांचा सन्मान हा लोकशाहीचा सन्मान आहे. पत्रकारांवरील शाब्दिक, मानसिक किंवा शारीरिक हल्ले कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत. पत्रकारांच्या स्वाभिमानाचे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम शेवटपर्यंत संघर्ष करेल. तरी आपल्या स्तरावर या निवेदनाची तातडीने दखल घेऊन ते महाराष्ट्र शासनाकडे पाठवावे व योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी नम्र विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर प्रदेश सरचिटणीस डॉ. डिगंबर महाले, साप्ताहिक विंग चे जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी, जिल्हा संघटक जयेशकुमार काटे, तालुकाध्यक्ष उमेश काटे, शहराध्यक्ष जयंतलाल वानखेडे, राज्य प्रसिद्धी प्रमुख बापूराव ठाकरे, धनंजय सोनार, ईश्वर महाजन, भाऊसाहेब पाटील, निरंजन पेंढारे, दयाराम पाटील, विवेक अहिरराव, संजय पाटील आदींच्या सह्या आहेत.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!