भाजपला सत्तेपासून रोखणे हीच महाआघाडीची खेळी. सावध पवित्रा घेत भाजपने ५० : ५० फॉर्म्युला पाळला नाही तर भाजप जिंकूनही हारणार.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचे निकाल २४ ऑक्टोबरला जाहीर झाले. राज्यात भाजप व शिवसेना महायुती आहे. महायुतीला बहुमताचा कल मिळाल्याने सरकार स्थापनेला वाव असूनही मुख्यमंत्री कोण ? यावर घोडे अडले आहे. राज्याच्या सत्ता स्थापनेत ‘दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ’ होण्याची शक्यता जास्त दिसते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाआघाडी आहे. कोणाचा पाठिंबा मिळाला तरच ते सरकार बनवू शकतात. आठवडा उलटूनही राज्यात अजून कोणाची सत्ता स्थापन झालेली नाही. भाजपला शिवसेनाशिवाय सत्ता स्थापन करणे अवघड आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आलेत तर बहुमतात जात नाही. सध्या शिवसेनेला काँग्रेस पाठिंबा द्यायला तयार नाही. यामुळे भाजप व शिवसेनाची चांगलीच कोंडी झाली आहे. महायुतीला सत्ता स्थापनेत अपयश आल्यास, राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री पदाचे दावेदार असू शकतील. राष्ट्रवादीला काँग्रेसचा पाठिंबा आहेच त्यांना शिवसेना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. शिवसेनेला महायुतीत मिळणारे उपमुख्यमंत्री पद राष्ट्रवादीकडूनही सन्मानाने मिळणार आहे.
भाजप वा राष्ट्रवादी पक्षाचा मुख्यमंत्री झाल्यास आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होऊ शकतात हे उघड आहे. महायुतीने ५० : ५० फॉर्म्युला पाळला तरच भाजप सत्ता स्थापन करेल असे आतापर्यंतच्या चर्चेतून लक्षात येते. काँग्रेसकडून राष्ट्रवादीला पाठिंबा आहेच, शिवसेनाने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यास त्यांच्यावर टीका होण्याचा फारसा धोका नाही. राष्ट्रवादीच्या गोटात याबाबत खलबते सुरु झाल्याचे कळते. शिवसेनेला पाठिंबा द्यावा, यासाठी काँग्रेसचे काही नेते आग्रही आहेत. मात्र.. काँग्रेस शिवसेनेला थेट पाठिंबा देऊन अडचणीत येण्यापेक्षा राष्ट्रवादीला पाठिंबा देईल मात्र सत्तेत सहभागी होणार नाही, बाहेरून पाठिंबा देईल. भाजपला सत्तेपासून रोखणे ही महाआघाडीची खेळी आहेच. शिवसेना व राष्ट्रवादी सत्ता स्थापन करुन ५० : ५० फॉर्म्युलानुसार सत्तेचं वाटप होईल, अशी मोठी शक्यता आहे. याआधी विधीमंडळाचा सदस्य नसलेली व्यक्ती मुख्यमंत्री झालेली आहे हे लक्षात घेता राष्ट्रवादी सत्तेत गेल्यास शरद पवार पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊन त्यांचा पुर्व अनुभव महाराष्ट्राचा विकास घडवू शकेल अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. यापेक्षा राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद असेल असे म्हणायला हरकत नाही. भाजपने सावध पवित्रा घेत ५० : ५० फॉर्म्युला पाळला तरच महायुतीचे सरकार येईल असे चित्र आहे. तसे झाले नाही तर भाजप जिंकूनही हारणार आहे.