‘माणूस पैशाने, वयाने मोठा होत नसतो तर माणसाचं कर्तृत्व हेच त्याला मोठं बनवते ‘ : प्रा. लिलाधर पाटील

पिंपळे रोडवरील वामन नगर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज.. व्यक्ती, व्यक्तीमत्व आणि कर्तृत्व’ विषयावर व्याख्यानात सूर

अमळनेर : ‘माणूस पैशाने, वयाने मोठा होत नसतो तर माणसाचं कर्तृत्व हेच त्याला मोठं बनवते ‘ असे मत प्रसिद्ध वक्ते प्रा. लिलाधर पाटील यांनी व्यक्त केले. युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर आयोजित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पिंपळे रोडवरील वामन नगर येथे प्रमुख वक्ते म्हणून प्रा. लिलाधर पाटील यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज.. व्यक्ती, व्यक्तीमत्व आणि कर्तृत्व’ या विषयावर नुकत्याच झालेल्या व्याख्यानावेळी ते बोलत होते. यावेळी विचार मंचावर प्रा.अशोक पवार, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष रामेश्वर भदाणे, पत्रकार संजय सूर्यवंशी, अरुणबापू देशमुख, श्रीकांत चिखलोदकर, प्रेमराज पवार, श्रीमती रंजना देशमुख आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन जिजाऊ वंदना गायिली. प्रा. अशोक पवार यांनी युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर आयोजित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत ७५ वक्ते घडवून ७५ ठिकाणी व्याख्यानमालेचे आयोजन करण्याबाबतची भूमिका प्रास्ताविकातून सांगितली. यानंतर शालेय विद्यार्थी – विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांचेविषयी आपले विचार मांडले. यात, श्रद्धा जाधव, लावण्या शिसोदे, ऋतिका धनगर, मुस्कान तडवी, कुमुद मगर, गायत्री भोई, वेदांती दिपक, डिंपल शिसोदे, कृष्णा चांभार, श्वेता, निशांत पवार, शैलजीत शिंदे, अजिंक्य सोनवणे आदींनी सहभाग घेतला. सर्व विद्यार्थ्यांची भाषणे झाल्यावर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. लिलाधर पाटील यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज.. व्यक्ती, व्यक्तीमत्व आणि कर्तृत्व’ या विषयावर व्याख्यानातून प्रकाश टाकला.

‘जय जय महाराष्ट्र माझा..’ या गीताने कार्यक्रमात रंगत आणली. वेदांती दिपक ने राजमुद्रा बोलून दाखवली. निशांत पवार याने पोवाडा सादर केला. कु.शैलजित शिंदे, अजिंक्य सोनवणे या विद्यार्थ्यांची भाषणे लक्षवेधी ठरली. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तक भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रेमराज पवार यांनी केले. कार्यक्रमास परिसरातील महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व नागरिकांचे सहकार्य लाभले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!