‘ दुसऱ्यांसाठी जगणं ‘ हाच सुखाचा मोठा क्षण : शिव व्याख्याते लक्ष्मण पाटील

शिवक्षेत्र खवशी येथे झाला शिव विचारांचा जागर

अमळनेर : माणूस जगत असताना तो कसा जगतो याला महत्त्व आहे. सुखाचा क्षण कोणता ? असा जर कोणी प्रश्न केलाच तर, ‘ दुसऱ्यासाठी जगणं ‘ हाच सुखाचा मोठा क्षण मानावा असे मत शिव व्याख्याते लक्ष्मण पाटील यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती पंधरवाडा निमित्त काल सोमवार (दि.२७) रोजी तालुक्यातील खवशी, ता अमळनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळील प्रांगणात शिव विचारांचा जागर झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर चे अध्यक्ष प्रा.अशोक पवार होते. सोबत विचार मंचावर बाल विद्यार्थी वक्ता अजिंक्य सोनवणे, अरुण देशमुख, बापूराव ठाकरे, अजय भामरे, भगवान गोसावी उपस्थित होते.

सर्वप्रथम ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय…’, ‘तुमचं आमचं नातं काय, जय भवानी जय शिवराय…’ अशा जोरदार घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन शिव व्याख्याते लक्ष्मण पाटील यांचे हस्ते करण्यात आले. यानंतर प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींनी स्वागत गीत म्हटले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी अरुण देशमुख यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाबाबत संकल्पना मांडली. सानेगुरुजी शाळा, अमळनेर येथील इयत्ता नववी तील विद्यार्थी वक्ता अजिंक्य सोनवणे याने शिव विचारांची जोरदार तोफ डागली. त्यात लहान थोर काहीसे घायाळ झाले. त्यांच्या वक्तृत्वाला श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.

शिवव्याख्याते लक्ष्मण पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांना डोक्यावर नव्हे तर डोक्यात घ्यायला हवे. त्यांचे कार्य काळात स्वतःच्या डोक्याने विचार करणारे व स्वतःहून जबाबदारी घेणारे लोक होते. आता मोबाईलवरच वेळ जात असल्याने डोक्याचा वापर होत नाही व स्वतःहून जबाबदारी कोणी घेत नाही. प्राथमिक शिक्षणाचा विचार केला तर सरळ वरच्या वर्गात ढकलले जात असल्याने दहावीपर्यंतचा प्रवास अगदी सोपा झाला आहे. एकप्रकारे शिक्षण हिरावून घेतले आहे. कोणत्याही विषयावर बारीकसारीक गोष्टींचा अभ्यास करुन नियोजन करणं हे शिवरायांचे विचार.. सकारात्मक विचार केला तर नकारात्मक विचार येत नाही. मुगल सत्ता उलथवून लावण्याचा संघर्ष हे त्याचेच उदाहरण आहे.. सुखाचा क्षण कोणता ? असा जर कोणी प्रश्न केलाच तर, ‘ दुसऱ्यासाठी जगणं ‘ हाच सुखाचा मोठा क्षण मानावा असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रा.अशोक पवार यांनी युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर आयोजित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत ७५ वक्ते घडवून ७५ ठिकाणी व्याख्यानमालेचे आयोजन करण्याबाबतची भूमिका विशद केली. शिवजयंतीचा पंधरवाडा सर्वत्र साजरा केला जात असल्याचेही सांगितले. याप्रसंगी सचिन सूर्यवंशी, संजय सूर्यवंशी, गणेश बाविस्कर, भागवत सूर्यवंशी, कैलास पाटील, हेमकांत देसले, सुर्यकांत कापडे, संजय कापडे, चंद्रकांत पाटील, अनिल शिरसाठ, धनराज पवार, महेंद्र गोसावी, बापू पवार गावातील विविध संस्थेचे पदाधिकारी, नागरिक व तरूण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद कापडे यांनी तर आभार कैलास पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अरुण देशमुख, सचिन सूर्यवंशी यांनी विशेष प्रयत्न केले. याकामी सर्व तरुणांचे सहकार्य लाभले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!