राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत गं.स. हायस्कूल येथे सहभागी शिव व्याख्यात्यांचा सन्मान

‘जीवन जगताना आपली उंची वाढवा, दुसऱ्याशी तुलना करु नका’ : वासुदेव देसले

अमळनेर : ‘जीवन जगताना नेहमी आपली उंची वाढवा, दुसऱ्याशी तुलना करु नका’ असे मत कोपरगाव येथील पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी व्यक्त केले. काल रविवार (दि.१२) रोजी अमळनेर येथील गं.स. हायस्कूल च्या सभागृहात शिव जयंती पंधरवाडा निमित्त युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत ७५ वक्ते ७५ व्याख्याने उपक्रमात सहभागी विद्यार्थी व सिनीअर वक्त्यांचा पालकासह सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. सत्कारावेळी वक्त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेले मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले. विचार मंचावर तालुक्यातील भूमीपुत्र तथा कोपरगावचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले अध्यक्षस्थानी होते. सोबत रोटरी क्लबचे अध्यक्ष किर्तीभाई कोठारी, दहिवद येथील माजी सरपंच सुषमाताई देसले, धनदाई शिक्षण समूहाचे के.डी.पाटील, शिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे, प्रा.अशोक पवार उपस्थित होते. सौ.वसुंधरा लांडगे यांनी जिजाऊ वंदना गायिली. आयोजकांतर्फे उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी प्रा.अशोक पवार यांनी प्रास्ताविक केले.

अध्यक्षीय भाषणात वासुदेव देसले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी जातीभेद न करता मुस्लिमांना सोबत घेऊन मुगल सत्ता उलथवून लावण्यासाठी संघर्ष केला. मात्र.. बऱ्याचदा चूकीची माहिती पसरवण्यात येते. व्याख्यान करतांना ते अभ्यासपूर्ण असावं. लोकशाहीत ज्या गोष्टीची गरज आहे त्या विषयावर व्याख्यानातून जागरुकता निर्माण करण्याचा विश्वास असावा. जीवन जगताना आपली उंची वाढवावी, दुसऱ्याशी तुलना करु नका असा मौलिक विचार मांडला. राजे पुन्हा जन्माला या म्हणणं सोपं असलं तरी.. राजे आपल्या रक्तातच असायला हवेत असेही ते म्हणाले. प्रा.अशोक पवार यांनी सुरु केलेल्या या अभियानाचे व शहरात मुस्लिम समाजबांधवांनी शिवजयंती साजरी केल्याबद्दल त्यांनी भरभरुन कौतुक केले.

प्रा.अशोक पवार पवार यांनी प्रास्ताविकातून राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानाबाबत भूमिका विशद केली. प्रथमच २३ शाळा, महाविद्यालय, व गावागावात जाऊन शिवजयंती २०२३ पंधरवाडा साजरा केल्याचे सांगितले. या अभियानात ७४ विद्यार्थी वक्ते तर २६ सिनियर वक्त्यांनी सहभाग नोंदविला. मुलांना तणावमुक्त करण्यासाठी भाषणाचंं स्वातंत्र्य द्या, त्यांचे स्वागत करा. वक्त्यांचे अमळनेर म्हणून ओळख व्हावी ही प्रा. लिलाधर पाटील यांची संकल्पना होती. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत असे त्यांनी सांगितले. एप्रिल महिन्यात महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त देखील असाच उपक्रम राबविण्यात येणार असून ज्या कोणाला या उपक्रमात सहभागी व्हावयाचे असेल त्यांनी आपले नाव युवा कल्याण प्रतिष्ठान कडे नोंदणी करुन घ्यावी. यासाठी एप्रिल अखेर वक्त्यांची कार्यशाळा घेण्यात येणार असून त्यात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याप्रसंगी मनोहर निकम, अरुण देशमुख, कृष्णा पाटील, अॅड. तिलोत्तमा पाटील, सानेगुरुजी शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता बोरसे, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, रामेश्वर भदाणे, संजय सूर्यवंशी, प्रेमराज पवार, श्रीकांत चिखलोदकर, बापूराव ठाकरे, अजय भामरे, राहुल निकम, दयाराम पाटील, विद्यार्थी वक्ते, पालक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिलाधर पाटील यांनी तर बापूराव ठाकरे यांनी आभार मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!