धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष न करता नियमित आरोग्य तपासणी करावी : डॉ. निखिल पाटील
मारवड : शरीरातील कमी असलेले रक्ताचे प्रमाण चिंतेचा विषय असून त्यामुळे शरीराची वाढ खुंटून आरोग्याच्या विविध तक्रारी उद्भवतात. त्यामुळे दररोज योग्य आहार, व्यायाम व तणावमुक्त राहून आरोग्याची काळजी घ्यावी. आपल्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आपले आरोग्य बिघडू न देता जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन नियमित आपली आरोग्य तपासणी करावी असे मत मारवड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल पाटील यांनी व्यक्त केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व (कै.) न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आत्मनिर्भर युवती अभियानाच्या अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र मारवड येथे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींसाठी हिमोग्लोबिनची तपासणी व आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महाविद्यालयाच्या सुमारे पन्नास विद्यार्थिनींचे वजन, उंची व हिमोग्लोबिन तपासणीसह त्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांच्या शरीरात हिमोग्लोबिनची मात्रा आवश्यकतेपेक्षा कमी आढळली त्यांना रक्तवाढीच्या गोळ्या देण्यासह दैनंदिन आहाराबाबत डॉ.निखिल पाटील व डॉ. विद्या देवरे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींद्वारा विचारल्या गेलेल्या आरोग्याच्या तक्रारी व विविध प्रश्नांबाबत डॉ. विद्या देवरे यांनी माहिती दिली.
तत्पूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व सहाय्यक कर्मचाऱ्यांचे महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजय पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेच्या महिला कार्यक्रम याधिकारी प्रा.डॉ.नंदा कंधारे, प्रा. किशोर पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या आत्मनिर्भर युवती अभियाना निमित्त घेण्यात आलेल्या शिबिरात आर.वाय. पाटील (आरोग्य सहाय्यक) श्रीमती सी.आय.भोळे (आरोग्य सहाय्यिका ), श्रीमती सुनीता गावित (आरोग्य सेविका), मेढे भाऊ (सहाय्यक) यांनी विशेष सहकार्य केले. प्रा. किशोर पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.